श्री खंडोबाचा विवाह सोहळा संपन्न; मलवडीतील शुक्रवारचा रथोत्सव रद्द


 


स्थैर्य, दहिवडी, दि.२१: श्री क्षेत्र मलवडी (ता. माण)
येथील श्री खंडोबाचा विवाह सोहळा काल नाग दिव्यांच्या मुहूर्तावर
मंगलवाद्यांच्या निनादात रात्री 11:15 मिनिटांनी देवस्थानचे विश्वस्त,
मानकरी, सालकरी, भाविक-भक्त व ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात झाला.

 

येथील श्री खंडोबाच्या वार्षिक यात्रेस हळदी सोहळ्याने सुरुवात झाली आहे.
15 डिसेंबर रोजी देव दीपावलीच्या मुहूर्तावर रात्री 9:15 मिनिटांनी
“श्रीं’च्या हळदी लागल्या. काल “श्रीं’चा विवाह सोहळा झाला. यानिमित्त
मंदिर आकर्षक विद्युतरोषणाईने सजविण्यात आले आहे. काल रात्री दहा वाजता
सनई-चौघडे व वाद्यवृंदाच्या साथीने सर्व मान्यवर मंडळी वाजतगाजत “श्रीं’चा
बस्ता बांधण्यासाठी सदाशिव मुळे यांच्या कापड दुकानात गेले. “श्रीं’चे कपडे
खरेदी केल्यानंतर सर्व जण मंदिरात आले. पुजाऱ्यांनी विधिवत श्री खंडोबा व
श्री म्हाळसा यांना नवीन पोशाख परिधान केला.

 

रात्री 10:30 मिनिटांनी लग्नाच्या धार्मिक विधीला ब्राह्मण व जंगम यांनी
सुरुवात केली. सर्वांना अक्षता वाटण्यात आल्या. रात्री 11:15 मिनिटांनी
“श्रीं’च्या विवाह सोहळ्यास सुरुवात झाली. येथील श्री खंडोबा मंदिरात मुख्य
गाभारा व त्या बाहेरील मंडपामध्ये अशा दोन ठिकाणी “श्रीं’च्या मूर्ती
आहेत. त्यामुळे दोन वेळा लग्न लावली जातात. अतिशय भक्तिपूर्ण व उत्साही
वातावरणात “श्रीं’चा विवाह सोहळा झाला. त्यानंतर फटाक्‍यांची आतिषबाजी
करण्यात आली. यानंतर देवस्थानकडून परंपरेनुसार विविध मानकऱ्यांना मानाची
रक्कम देण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांची वार्षिक बैठक झाली. 

खंडोबाचा रथोत्सव रद्द 

श्री खंडोबाचा वार्षिक रथोत्सव शुक्रवार 25 डिसेंबर
रोजी आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली असून,
रथोत्सव होणार नाही. फक्त मंदिरातील धार्मिक कार्यक्रम प्रशासनाच्या
देखरेखीखाली होतील, असे सांगण्यात आले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!