
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांच्या सुविधांसाठी ग्रामविकास विभागाकडून सुमारे सहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १३ : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी खंडाळा व फलटण तालुक्यात वारकऱ्यांना विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाकडून ५ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने’अंतर्गत हा निधी देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
मंत्री जयकुमार गोरे यांनी तरडगाव व लोणंद पालखी तळ, नीरा दत्तघाट आणि पालखी मार्गाची पाहणी केली. यावेळी आमदार धैर्यशील कदम, सुवर्णगाथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत, प्रांताधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सुहास थोरात यांच्यासह विविध पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
निधीची कमतरता भासू देणार नाही
पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मूलभूत सुविधा देण्यासाठी ग्रामविकास खात्याने काटेकोर नियोजन केले आहे. संतांचे पालखी सोहळे आणि राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधी देण्यात ग्रामविकास विभाग कधीच कमी पडणार नाही, अशी ग्वाही यावेळी गोरे यांनी दिली. पालखी काळात वारकरी आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वच विभागांनी योग्य काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पालखी मार्गावरील विविध कामे
मंजूर करण्यात आलेल्या निधीतून पाडेगाव येथे नीरा नदीकाठी घाट, दशक्रिया चौथरा, अस्थिकुंड, बंदिस्त गटर आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच नीरा दत्तघाट नदीकाठी काँक्रिटीकरण, विद्युत व्यवस्था, जलशुद्धीकरण प्रकल्पाची रस्ता सुधारणा केली जाईल. याशिवाय लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरुस्ती, तरडगाव आणि बरड पालखीतळ सुधारणा, रस्ता काँक्रिटीकरण व पालखी काळात वापरण्यात येणाऱ्या पर्यायी रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे.