प्रतापगड संवर्धन मूळ ढाचा न बदलता करणार 

प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाच्या बैठकीत १२७ कोटी रुपयांच्या संवर्धन आराखड्यावर चर्चा झाली. मूळ ढाचा न बदलता विकासकामे करण्याचे निर्देश दिले.

स्थैर्य, सातारा, दि. १३ : प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची बैठक खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात पार पडली. या बैठकीत १२७ कोटी रुपयांच्या निधीतून किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करताना किल्ल्याच्या मूळ ढाच्यात कोणताही बदल न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

शतकानुशतके टिकणारे काम करा

प्रतापगड हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झाले आहे. याच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीला मंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या प्रतापगडाचे बांधकाम गेले ४०० वर्षे अभेद्य आहे. आता होणारे संवर्धनाचे कामही पुढे शतकानुशतके टिकले पाहिजे, अशा कडक सूचना मंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पर्यटन वाढीवर भर

शिवकाळात पार येथे बाजारपेठ होती. प्रतापगडच्या विकास आराखड्यात या बाजारपेठेचा समावेश करावा आणि किल्ल्याशी संबंधित विविध ठिकाणांचा पर्यटन वाढीच्या दृष्टीने विचार करावा, अशी सूचना मंत्री मकरंद पाटील यांनी केली. यामुळे परिसरातील ऐतिहासिक स्थळांना पुन्हा महत्त्व प्राप्त होणार आहे.

भित्तीचित्रे आणि तलावांचे पुनरुज्जीवन

गडावर शिवचरित्रातील महत्त्वपूर्ण प्रसंग दर्शवणारी भित्तीचित्रे उभारणे आणि लाईट अँड साऊंड शो सुरू करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या शोसाठी ऐतिहासिक विषयांचे लेखन करणाऱ्या दिग्गजांकडून संहिता लिहून घेत सांस्कृतिक विभागाची मान्यता घेण्याचे ठरले. तसेच, स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी दिव्यांग आणि वृद्धांसाठी डोलीची व्यवस्था करणे, जुन्या तीन तलावांतील गाळ काढून त्यांचे पुनरुज्जीवन करणे यावरही भर देण्यात आला.

सुरू असलेल्या विकासकामांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करून घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. महाराज जेथून दैनंदिन कामकाज करत होते, त्या वास्तूची पुन्हा उभारणी करण्यासाठी पुरातत्त्व विभागाला प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच, किल्ल्यावरील मंदिरांचा देखावा ४०० वर्षांपूर्वीसारखाच ठेवण्यावर एकमत झाले.

Back to top button
Don`t copy text!