सातारा: रस्ता सुरक्षा समितीची बैठक – वाहतूक नियमनाचे निर्देश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सातारा येथे रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात वाहतूक नियमनाचे आणि कारवाईचे कडक निर्देश देण्यात आले.

स्थैर्य, सातारा, दि. 13 : सातारा येथे संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत रस्ता सुरक्षा, वाहतूक नियमन आणि अपघातांवर उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

महामार्गावरील उपाययोजना आणि ब्लॅकस्पॉट

नवीन महामार्गाच्या कामामुळे शेतात साचणाऱ्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना भोसले यांनी दिल्या. पेट्रोलपंपालगत तोडलेले डिव्हायडर पूर्ववत जोडावेत, तसेच वाहनचालकांनी महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे यावेळी ते म्हणाले. तालुकास्तरीय समित्या नेमून ब्लॅकस्पॉट शोधावेत आणि ट्रॉमा केअर सेंटरमध्ये डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशीही सूचना त्यांनी केली.

जड वाहनांवर कारवाईचे निर्देश

रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने जड मालवाहतूक करणारी वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने चालविण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. मात्र, वाहनधारक या नियमांचे पालन करत नसल्याने अपघात आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. महामार्गालगतच्या पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नियम मोडणाऱ्या या जड वाहनधारकांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश देसाई यांनी दिले.

या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विश्वास सातपुते आणि कार्यकारी अभियंता राहुल अहिरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!