पालखी मार्गावर ड्राय डे घोषित – प्रशासनाचा कडक इशारा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त सातारा जिल्ह्यातील पालखी मार्गावर १५ ते १९ जुलै दरम्यान ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सर्व दारू दुकाने बंद ठेवण्याचे कडक आदेश दिले आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. १३ : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील पालखी मार्गावर १५ ते १९ जुलै या कालावधीत सर्व प्रकारची दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार पालखीच्या मार्गक्रमणानुसार या भागात कोरडा दिवस (ड्राय डे) घोषित करण्यात आला आहे.

कायदा व सुव्यवस्थेसाठी निर्णय

पालखी सोहळ्यादरम्यान सातारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. पालखी प्रस्थान, मार्गक्रमण व मुक्कामाच्या ठिकाणी सर्व प्रकारची देशी आणि विदेशी दारूची दुकाने, बिअर बार व ताडीची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

तारखांनुसार मद्यविक्रीवर बंदी

प्रशासनाच्या आदेशानुसार १५ जुलै रोजी पाडेगाव, बाळ पाटलांची वाडी आणि लोणंद शहर येथे ड्राय डे असेल. १६ जुलैला लोणंद शहर व परिसर (पालखी तरडगावला पोहोचेपर्यंत) बंद राहील. १७ जुलै रोजी तरडगाव ते फलटण रस्ता, फलटण शहर, काळज, सुरवडी, निंभोरे ओढा आणि वडजल परिसरात मद्यविक्री बंद असेल.

तसेच, १८ जुलैला फलटण ते बरड रस्ता, बरड, विडणी, पिंपरद, निंभळक फाटा येथे, तर १९ जुलै रोजी साधुबुवाचा ओढा, धर्मपूरी, बरड व राजुरी पानसकरवाडी येथे दुकाने बंद ठेवण्यात येतील. पालखी पुढे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.

उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकाविरुद्ध मुंबई मद्य निषेध कायद्यानुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच दुकाने बंद ठेवण्यात आलेल्या या कालावधीसाठी प्रशासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई दिली जाणार नाही, असेही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button
Don`t copy text!