
स्थैर्य, फलटण, दि. २२ जुलै : राज्याचे मुख्यमंत्री तथा देशातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर दौऱ्यावर होते. या अत्यंत व्यग्र दौऱ्यादरम्यान त्यांनी फलटण तालुक्याला आणि विशेषतः माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आपला बहुमूल्य वेळ दिला. पंढरपूरवरून परतीच्या प्रवासात मुख्यमंत्र्यांनी विंचुर्णी येथील रणजितदादांच्या फार्म हाऊसवर आवर्जून थांबा घेत आपला वाढदिवस केक कापून साजरा केला, ज्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात रणजितदादांच्या राजकीय वजनाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
सुरवडीत चहापान आणि विंचुर्णीत वाढदिवसाचे सेलिब्रेशन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूरकडे जात असताना त्यांनी सुरुवातीला सुरवडी येथील ‘हॉटेल प्राईड इलाईट’ या ठिकाणी थांबून चहापानाचा आस्वाद घेतला. विठुरायाचे दर्शन घेऊन पंढरपूरवरून परतीच्या प्रवासात त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विंचुर्णी येथील फार्म हाऊसवर विशेष भेट दिली. या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी केक कापून अत्यंत खेळीमेळीच्या आणि घरगुती वातावरणात आपला वाढदिवस साजरा केला तसेच स्नेहभोजनाचा आस्वादही घेतला.

निंबाळकर कुटुंबीयांकडून मुख्यमंत्र्यांना विशेष शुभेच्छा
या विशेष क्षणी उपस्थित मान्यवर आणि निंबाळकर कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांना उदंड आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, युवा नेत्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सौ. मनीषाताई समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच, कुटुंबातील नव्या पिढीने म्हणजेच माजी खासदार रणजितदादांच्या कन्या ताराराजे व इंदिराराजे आणि नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे सुपुत्र रणवीरराजे व ऐश्वर्याराजे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांनीही या सर्वांशी अत्यंत आत्मियतेने संवाद साधला.
रणजितदादांचे भक्कम राजकीय वजन अधोरेखित
संपूर्ण देशामध्ये ‘टॉप १०’ नेत्यांमध्ये गणले जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त नियोजित दौऱ्यासाठी जात असताना आणि येत असताना, त्यांनी आवर्जून फलटण येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी आपला वेळ दिला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या वाढदिवसासारख्या खास दिवशी विंचुर्णी येथील फार्म हाऊसवर वेळ घालवणे, यातून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील असलेले भक्कम राजकीय वजन पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाले आहे.
