

सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीचे वेध लागले असून, दोन्ही जिल्ह्यांतील राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीकडे तब्बल ६३० मतांचे स्पष्ट संख्याबळ असल्याने ही जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे.
स्थैर्य, सातारा, दि. 29 मे : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीचे रण आता रंगू लागले आहे. मतदारसंख्येचे गणित, पक्षीय ताकद आणि इच्छुकांची वाढती संख्या यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सर्वाधिक मोठा पक्ष असल्याने भाजपने निवडणुकीची तयारी वेगाने सुरू केली असून, उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठवली आहेत.
उमेदवारीसाठी भाजपमध्ये चुरस आणि ‘धक्कातंत्रा’ची शक्यता
या निवडणुकीसाठी भाजपमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. साताऱ्यातून भाजपचे नेते शेखर गोरे, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि सुनील काटकर यांची नावे चर्चेत आहेत. तर सांगलीतून भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची नावे आघाडीवर आहेत. स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे, संघटनात्मक ताकद आणि आगामी निवडणुकांचे गणित लक्षात घेऊन उमेदवार निश्चित केला जाणार आहे. नेहमीप्रमाणे भारतीय जनता पार्टी या निवडणुकीतही ‘धक्कातंत्र’ वापरून अनपेक्षित उमेदवारी जाहीर करू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दृष्टिक्षेपात मतदारसंख्येचे गणित
सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे.
-
महायुतीची ताकद (६३० मते): सांगलीत भाजपकडे ११५, तर साताऱ्यात १९९ असे एकूण ३१४ मतदार आहेत (यात रयत क्रांती आणि जनसुराज्यच्या प्रत्येकी एका मताचा समावेश आहे). याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २०५ आणि शिवसेनेकडे १११ मतांचे बळ आहे. त्यामुळे महायुतीची एकत्रित ताकद ६३० वर पोहोचली आहे.
-
महाविकास आघाडीचे बळ (१९३ मते): काँग्रेसकडे सांगली-साताऱ्यात मिळून केवळ ७३ मतदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ११९, तर उद्धवसेनेकडे फक्त एक मतदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ १९३ वरच थांबते.
महाविकास आघाडीचा सावध पवित्रा
मागील निवडणुकीत दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रभावामुळे काँग्रेसच्या मोहनराव कदम यांनी विजय मिळवला होता. मात्र, यावेळी परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसत आहे. संख्याबळ अपुरे असल्याने आघाडीतील नेत्यांनी उमेदवारी जाहीर करण्यास सावध भूमिका घेतली आहे. उमेदवारीबाबत पडद्यामागे चर्चा सुरू असून, सातारा जिल्ह्यातून माजी मंत्री बाळासाहेब पाटील आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, तर सांगली जिल्ह्यातून राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. मात्र, ठोस आकड्यांअभावी मविआकडून अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.