

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अनुसूचित जाती (SC) आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या निर्णयाची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी फलटण तालुक्यातील सकल मातंग समाज व इतर घटकांची शनिवारी (दि. ३०) कोळकी येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 29 मे : सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने १ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यांना अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्यास परवानगी देणारा ऐतिहासिक निर्णय दिला होता. या निर्णयाची महाराष्ट्र राज्यात लवकरात लवकर आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरवण्यासाठी कोळकी (ता. फलटण) येथील विश्रामगृहात उद्या, शनिवार दि. ३० मे रोजी दुपारी २:०० वाजता एका विशेष तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
बैठकीतील महत्त्वाचे विषय
या बैठकीमध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीबाबत समाजाची आगामी भूमिका काय असावी, तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून जनजागृती कशी करावी आणि आगामी काळातील संघटनात्मक कार्यक्रम कसे राबवावेत, यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.
उपस्थित राहण्याचे आवाहन
आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा फायदा तळागाळातील आणि खऱ्या अर्थाने वंचित असलेल्या समाजघटकांना मिळावा, यासाठी समाजाची एकजूट आवश्यक आहे. त्यामुळे या बैठकीला फलटण तालुक्यातील मातंग समाज बांधवांनी तसेच संबंधित सर्व समाजघटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मातंग समाज, फलटण तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.