सातारा पोलीस दलाची किल्ले संतोषगडावरील गडभ्रमंती व स्वच्छता मोहीम यशस्वी; ५५ किलो कचरा केला गोळा


दैनिक स्थैर्य | दि. ५ मार्च २०२३ | फलटण |
सातारा पोलीस दलामार्फत किल्ले संतोषगड (ता. फलटण) या ठिकाणी ‘आपले किल्ले आपली जबाबदारी’ या अनुषंगाने आज गड भ्रमंती व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये जैविक व अजैविक असा अंदाजे ५५ किलो कचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेत जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. तसेच पोलीस दलातर्फे या मोहिमेबाबतची लिंक प्रसारित करण्यात आल्यामुळे फलटण तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकही सहभागी झाले होते. ही मोहीम यशस्वी झाल्याने जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांच्या या अभिनव उपक्रमाचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

किल्ले संतोषगडावर रविवारी झालेल्या मोहिमेदरम्यान गडाच्या पायथ्याला सर्व उपस्थित पोलीस अधिकारी व नागरिक एकत्र येऊन चढाई (ट्रेक) करण्यात आली. तसेच समूह तयार करून संतोषगडावरील महालक्ष्मी मंदिर व शिवकालीन बारव (विहीर) व इतर ठिकाणी नियोजनबद्धरित्या स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी जैविक व अजैविक अंदाजे ५५ किलो कचरा गोळा करण्यात आला. त्यानंतर संत गाडगे महाराज निवासी आश्रमशाळा, ताथवडा येथे एकत्र जमून स्थानिक नागरिक श्री. मोहन निवृत्ती जाधव यांनी संतोषगडाबद्दल माहिती दिली.

या मोहिमेत पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे बी. सी. गोडसे, खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक एम.के. इंगळे, शिरवळचे पोलीस निरीक्षक एन. के. मदने, लोणंदचे सपोनि व्ही. के. वायकर, फलटण शहरचे सपोनि नितीन शिंदे, सपोनि एस. बी. भोसले असे २० पोलीस अधिकारी, ११२ पोलीस अंमलदार व ७६९ नागरिक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

सातारा पोलीस दलामार्फत गडभ्रमंती व स्वच्छता मोहीम आत्तापर्यंत अजिंक्यतारा किल्ला, वसंतगड, जरंडेश्वर, वैराटगड व संतोषगड या ठिकाणी यशस्वीरीत्या राबविण्यात आली आहे. या मोहिमेत आजअखेर ८० पोलीस अधिकारी, ४८१ पोलीस अंमलदार, १४५० नागरिक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून एकूण अंदाजे ५९९ किलो कचरा गोळा करून योग्य विल्हेवाट लावण्यात आली आहे.

दरम्यान, सातारा पोलीस दलामार्फत प्रत्येक रविवारी जिल्ह्यातील एक किल्ला निवडून सदरची मोहीम राबविण्यात येणार असून या मोहिमेमध्ये नागरिक, व्यापारी व तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे नवीन पिढीमध्ये इतिहासाबद्दल जनजागृती होण्यासदेखील मदत होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!