इंग्रजी माध्यमांची ओढ, आपल्या भाषेविषयीचा संकोच आणि इतर भाषांबाबतची प्रतिष्ठा या बाबी मराठी भाषेसाठी मारक – प्रा. डॉ. अशोक शिंदे


दैनिक स्थैर्य | दि. ५ मार्च २०२३ | फलटण |
इंग्रजी माध्यमांची ओढ, आपल्या भाषेविषयीचा संकोच आणि इतर भाषांबाबतची प्रतिष्ठा या बाबी मराठी भाषेसाठी मारक ठरत आहेत, असे विचार प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी व्यक्त केले.

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण येथे ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून फलटण येथील प्रख्यात कवी, लेखक, मुधोजी महाविद्यालयातील मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. अशोक शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. नरेंद्र नार्वे उपस्थित होते.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व सांगून कविश्रेष्ठ कुसूमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचे मराठी भाषेतील साहित्यिक योगदान स्पष्ट केले.

मराठी भाषेच्या अस्तित्व व भविष्याबाबत बोलताना डॉ. शिंदे म्हणाले की, इंग्रजी माध्यमांची ओढ, आपल्या भाषेविषयीचा संकोच आणि इतर भाषांबाबतची प्रतिष्ठा या बाबी मराठी भाषेसाठी मारक ठरत आहेत. तसेच आधुनिक संस्कृतीच्या हव्यासापोटी आपली मूळची संस्कृती लोप पावत चालली आहे. त्यामुळे मराठी भाषेतील अनेक शब्द मुलांच्या कानावर पडत नाहीत. याउलट पाश्चात्त्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील आहार, विहार व वास्तव्याशी संबंधित सर्वच क्षेत्रांमध्ये सर्रासपणे इंग्रजी व इतर भाषांतील शब्द वापरले जात आहेत. घर, शाळा तथा परिसर, कार्यालये यामध्ये वापरल्या जाणार्‍या अनेक वस्तू वा पदार्थ पाश्चात्य संस्कृतीशी संबंधित असल्यामुळे त्याच त्याच भाषेतील शब्द वापरले जातात.

मराठी भाषा टिकवायची असेल तर ती दैनंदिन व्यवहारात बोलली गेली पाहिजे. भाषा हा आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. भाषा टिकवायची असेल तर आपली संस्कृती टिकली पाहिजे. यासाठी नवनिर्मिती, नवनवे शोध तथा संशोधन हे मराठी भाषा व संस्कृतीशी संबंधित झाले तर भाषा विकासाला आपोआप चालना मिळेल. यासाठी सर्व क्षेत्रात मराठी भाषा बोलली जावी. तसेच युवा अभियंत्यांनी संशोधन व नवनिर्मिती करताना मराठी संस्कृतीचा विचार व उपयोग केल्यास आपोआपच मराठी भाषेतून या नवीन गोष्टींना नावे मिळतील व मराठी भाषेला त्या माध्यमातून शब्दकोष मिळेल. आजमितीस आपल्या घरातील कितीतरी वस्तूंना इंग्रजी भाषेतून नावे असल्याचे आपणास आढळते. कारण त्याची निर्मिती विदेशात झाली. जर आपल्याकडे नवीन गोष्टी बनल्या तर नावेही आपल्याच भाषेत येतील. असे घडले तर मराठी भाषेची समृद्धी व संपन्नता संपूर्ण विश्वाला कळेल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य प्रा. डॉ. नरेंद्र नार्वे यांनी विद्यार्थ्यांना अवांतर वाचन करण्याचे आवाहन केले. चांगले साहित्य वाचल्यास आपोआप माणूस घडतो, वाढतो व त्याच्याकडून संस्कृतीही जतन केली जाते. त्यामुळे इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या पुस्तकांबरोबरच चांगली अवांतर पुस्तके वाचावीत, असे आवाहन केले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य मिलिंद नातू तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. दत्तात्रय शिंदे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!