गणेशोत्सवासाठी सातारा जिल्ह्यात पोलिसांचे नियमन; २९ सप्टेंबरपर्यंत अधिकाऱ्यांना विशेष अधिकार

सातारा जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक, वाहतूक, वाद्ये, ध्वनी प्रदूषण आणि सार्वजनिक ठिकाणांवरील व्यवस्थेसाठी पोलिसांना अधिकार देण्यात आले आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. 12 सप्टेंबर : सातारा जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, वाहतूक आणि ध्वनी प्रदूषणाचे नियमन करण्यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना २९ सप्टेंबरपर्यंत आवश्यक अधिकार प्रदान केले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३६ नुसार हे अधिकार देण्यात आले आहेत.

मिरवणुकीचे मार्ग, वेळ आणि वाद्यांवर नियंत्रण

गणेशोत्सवातील मिरवणूक कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळी काढावी किंवा काढू नये, मिरवणुकीतील व्यक्तींचे वर्तन व हालचाली कशा असाव्यात, याबाबत आवश्यक निर्देश देता येणार आहेत. सार्वजनिक रस्ते किंवा ठिकाणी गर्दीमुळे अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ढोल, ताशे आणि इतर वाद्यांच्या वापराचे नियमनही करता येणार आहे.

ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधांचे योग्य पालन व्हावे, तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी आवश्यक निर्देश देण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मोटार वाहनांचे नियमन तसेच कार्यक्रमासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्ती किंवा समूहांच्या हालचालींबाबतही निर्देश देता येणार आहेत.

कमानी, मंडप आणि रोषणाईसाठी परवानगी

सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही अशा पद्धतीने कमानी, मंडप, विद्युत रोषणाई, कटआऊट आणि जाहिराती उभारण्याबाबत परवानगी देता येणार आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना योग्य अटी व शर्तींवर संबंधितांना परवानगी देण्यासाठी प्राधिकृत केले आहे.

Back to top button
Don`t copy text!