DCS MH ॲपवर शेतकऱ्यांसाठी नवी सुविधा; आता स्वतः करता येणार पीक नोंदणी

DCS MH मोबाईल ॲपमध्ये शेतकऱ्यांना Farmer ID वापरून स्वतःच्या शेतातील पिकांची नोंदणी करण्याची सुविधा ११ सप्टेंबरपासून उपलब्ध झाली आहे.

स्थैर्य, मुंबई, दि. १२ सप्टेंबर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता DCS MH मोबाईल ॲपद्वारे स्वतःच्या शेतातील पिकांची नोंदणी करता येणार आहे. केंद्र शासनाच्या या ॲपमध्ये शेतकरी स्तरावरून पीक नोंदणीची सुविधा ११ सप्टेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आली असून, शेतकरी ओळख क्रमांकाचा (Farmer ID) वापर करून त्याच्याशी संलग्न सर्व शेतजमिनींवरील पिकांची नोंद करता येणार आहे.

Farmer ID टाकून करता येणार पीक नोंदणी

राज्यात DCS MH मोबाईल ॲपद्वारे सहाय्यक स्तरावरील पीक नोंदणीचे काम ११ ऑगस्टपासून सुरू आहे. पीक पाहणीचे काम अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक करण्याबरोबरच शेतकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी आता थेट शेतकरी स्तरावर पीक नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. ॲपमध्ये शेतकरी ओळख क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर त्या क्रमांकाशी संलग्न असलेल्या सर्व शेतजमिनींची पीक नोंदणी करता येईल. आवश्यकतेनुसार आणखी सुविधा समाविष्ट करून ॲपची अद्ययावत आवृत्ती लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शासकीय योजनांच्या लाभासाठी माहिती उपयुक्त

शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची अचूक आणि वेळेत नोंदणी करणे आवश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. ही माहिती विविध शासकीय योजना, अनुदान आणि इतर शासकीय सेवांचा लाभ देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी DCS MH मोबाईल ॲपचा वापर करून शक्य तितक्या लवकर पीक नोंदणी करावी, असे आवाहन शासनाने केले आहे.

Back to top button
Don`t copy text!