संडे SHGs मार्टमधील महिला बचत गटांना नवी संधी; २० गाळे देण्याचे आश्वासन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

संडे SHGs मार्टला भेट देत महिला बचत गटांच्या व्यवसायाचा आढावा घेण्यात आला. नगरपरिषदेच्या शॉपिंग सेंटरमध्ये २० गाळे देण्याचे आश्वासन देण्यात आले.

स्थैर्य, फलटण, दि. १२ सप्टेंबर : संडे SHGs मार्ट उपक्रमातील महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना फलटण नगरपरिषदेच्या शॉपिंग सेंटरमध्ये किमान २० गाळे आरक्षित करून देण्याचे आश्वासन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले. मार्टला भेट देऊन त्यांनी विविध स्टॉलची पाहणी केली तसेच महिलांशी संवाद साधून त्यांच्या व्यवसायातील अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या.

महिलांच्या उत्पादनांची खरेदी करून प्रोत्साहन

उपनगराध्यक्ष सौ. प्रियदर्शिनी भोसले, फलटण पंचायत समिती सभापती कु. शिवांजली भोसले, नगरसेविका सौ. सुपर्णा अहिवळे, सौ. मोहिनी हेंद्रे, कु. सिद्धाली शहा, सौ. मीना काकडे तसेच मुख्याधिकारी निखिल जाधव यांनीही उपक्रमाला भेट दिली. त्यांनी बचत गटांच्या विविध स्टॉलची पाहणी करून महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी केली. स्टॉलधारक महिलांशी संवाद साधत व्यवसायातील अडचणी, अपेक्षा, गरजा आणि ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाची माहिती घेतली.

सातत्य ठेवा, अडचणींमुळे खचू नका

महिलांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यवसायात सातत्य ठेवण्याचे आवाहन केले. सुरुवातीला ग्राहकांचा प्रतिसाद कमी असला तरी दर्जेदार उत्पादने, चांगली सेवा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे भविष्यात प्रतिसाद वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बचत गटांना नगरपरिषदेच्या शॉपिंग सेंटरमध्ये किमान २० गाळे आरक्षित करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. त्यामुळे महिला बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होण्याची संधी निर्माण झाली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!