सातारा जिल्हा बँकेची सूत्रे आता जयाभाऊ-रणजितदादा जोडीकडे!

रणजितदादांच्या बिनविरोध निवडीने राजे गटात अस्वस्थता; सोसायटी मतदारसंघात चुरस वाढली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे फलटणमधील समीकरणे बदलली आहेत.

स्थैर्य, फलटण, दि. २१ ऑक्टोबर : माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने संपूर्ण जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे. या ऐतिहासिक विजयामुळे आता जिल्हा बँकेची सर्व सूत्रे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडेच जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रणजितदादांच्या या बिनविरोध प्रवेशामुळे फलटण तालुक्याच्या स्थानिक राजकारणातही मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. तालुक्यावर अनेक दशके निर्विवाद वर्चस्व गाजविणाऱ्या विरोधी राजे गटामध्ये या घडामोडींमुळे प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. विधानसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत सलग सत्तांतरे घडवणाऱ्या रणजितदादांनी थेट जिल्हा बँकेत बिनविरोध मुसंडी मारल्याने विरोधकांचे राजकीय आडाखे पूर्णपणे कोलमडले आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर आता सर्वांच्या नजरा लागलेल्या फलटण तालुका सोसायटी मतदारसंघातील लढतीचे चित्रही पूर्णपणे पालटले आहे. या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने रणजितदादांच्या नेतृत्वाखाली फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर हे रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरोधात आमदार श्रीमंत रामराजेंच्या नेतृत्वात शिवसेना नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यात थेट आणि अटीतटीची लढत होत आहे. स्वतः रणजितदादा संचालकपदी बिनविरोध निवडून आल्यामुळे सोसायटी मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे मनोबल प्रचंड उंचावले असून, या मतदारसंघात आता समशेरसिंह यांच्या बाजूने वातावरण अधिक अनुकूल बनल्याचे स्पष्ट दिसत आहे. या नव्या समीकरणांमुळे फलटणच्या सोसायटी मतदारसंघातील लढत अधिक रंगतदार ठरणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!