सातारा जिल्हा बँक निवडणूक; मंत्र्यांसह ६ जणांची बिनविरोध निवड, उर्वरित जागांवर चुरशीच्या लढती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह ६ जणांची बिनविरोध निवड झाली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. 21 ऑक्टोबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या मुदतीनंतर अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार अतुल भोसले यांच्यासह ६ जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून उर्वरित मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती रंगणार आहेत.

६ जागांवर बिनविरोध निवड

कृषी पणन व खरेदी-विक्री संघ मतदारसंघातून मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव, नागरी बँक व पतसंस्था मतदारसंघातून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि कृषी प्रक्रिया संस्था मतदारसंघातून आमदार अतुल भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. यासोबतच सातारा तालुका विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून सर्जेराव सावंत, खटावमधून नंदकुमार मोरे, वाईमधून सत्यजीत वीर आणि गृहनिर्माण व दुग्ध उत्पादन संस्था मतदारसंघातून सोमनाथ धुमाळ हेदेखील बिनविरोध निवडून आले आहेत.

सोसायटी मतदारसंघांतील थेट लढती

उर्वरित तालुका सोसायटी मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या लढती रंगणार आहेत. पाटणमध्ये सत्यजित पाटणकर विरुद्ध पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, तर माण सोसायटी मतदारसंघात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, शिवसेना नेते शेखर गोरे आणि मनोजकुमार पोळ यांच्यात तिहेरी लढत होत आहे. फलटण सोसायटी मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर विरुद्ध फलटणचे नगराध्यक्ष समशेर नाईक निंबाळकर यांच्यात थेट लढत होणार आहे. जावलीत ज्ञानदेव रांजणे विरुद्ध विठ्ठल गोळे, महाबळेश्वरमध्ये रूपाली राजपुरे विरुद्ध संजय मोरे, कराडमध्ये उदयसिंह पाटील विरुद्ध धनंजय पाटील, कोरेगावमध्ये सुनील खत्री विरुद्ध सुनील माने, तर खंडाळ्यात शामराव गाढवे, संजीव गाढवे आणि अजय भोसले यांच्यात लढत होईल.

राखीव व जिल्हास्तरीय मतदारसंघांतील चुरस

राखीव मतदारसंघांमध्येही मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात माजी आमदार दीपक चव्हाण यांच्यासह रवींद्र बडेकर, सुरेश गायकवाड आणि सत्यवान कांबळे यांच्यात चौरंगी लढत रंगणार आहे. महिला राखीव मतदारसंघातून ऋतुजा पाटील आणि मंगल पाटील रिंगणात आहेत. इतर मागासवर्गीय मतदारसंघात योगेश फडतरे विरुद्ध संदीप पाचांगणे, तर विमुक्त जाती-भटक्या जमाती मतदारसंघात सुनील वाघ विरुद्ध अर्जुन काळे यांच्यात लढत होईल. औद्योगिक, विणकर व ग्राहक संस्था मतदारसंघात सुनील वाघ विरुद्ध चंद्रकांत जाधव अशी लढत होणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!