सातारा जिल्हा बँकेत राजकीय उलथापालथ! रामराजेंची ‘एक्झिट’ अन् रणजितदादांची बिनविरोध ‘धमाकेदार एन्ट्री’

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी माघार घेतली असून, नागरी पतसंस्था मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २१ ऑक्टोबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज राजकीय इतिहासातील सर्वात मोठी आणि खळबळजनक घडामोड समोर आली आहे. एका बाजूला माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची ‘नागरी बँका व नागरी सहकारी पतसंस्था’ मतदारसंघातून संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे; तर दुसऱ्या बाजूला जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ ओढवली आहे. या अनपेक्षित आणि ऐतिहासिक घडामोडीमुळे सातारा जिल्हा बँकेतून रामराजेंची ‘एक्झिट’ झाली असून, रणजितदादांची ‘धमाकेदार एन्ट्री’ झाली आहे.

सातारा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रावर अनेक दशकांपासून वर्चस्व गाजविणाऱ्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना जिल्हा बँकेच्या रिंगणातून माघार घ्यावी लागल्याने संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे रामराजेंच्या सहकारातील सत्तेला मोठा सुरुंग लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

दुसरीकडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महायुतीच्या माध्यमातून अतिशय चोख आणि भेदक रणनीती आखत ‘नागरी बँक व पतसंस्था’ मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला होता. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे रणजितदादांची ही निवड पूर्णपणे बिनविरोध झाली.

फलटण तालुक्यात आधी विधानसभा, त्यानंतर नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत ऐतिहासिक विजय मिळवून विरोधकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणाऱ्या रणजितदादांनी आता थेट सातारा जिल्हा बँकेच्या सर्वोच्च सत्ताकेंद्रावरही आपला झेंडा फडकवला आहे.

ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची बँकेतून झालेली माघार आणि रणजितदादांचा झालेला बिनविरोध प्रवेश, हा सातारा जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय समीकरणांना कलाटणी देणारा सर्वात मोठा राजकीय भूकंप मानला जात आहे.

या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण जिल्ह्यात रणजितदादा समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची जोरदार आतिशबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!