सातारा जिल्हा बँक निवडणुकीत नवा ट्विस्ट; उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठी घडामोड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सातारा जिल्हा बँकेत १० वर्षे संचालक राहिलेल्यांना उमेदवारी नाकारल्याने दिग्गज नेत्यांची अडचण झाली असून राजकीय समीकरणांना आता नवे वळण मिळाले आहे.

स्थैर्य, सातारा, दि. 14 ऑक्टोबर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. ज्या उमेदवारांनी यापूर्वी सलग १० वर्षे संचालकपद भूषवले आहे, त्यांना आता पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही. २१ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत असतानाच हा निर्णय आल्याने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील अनेक मातब्बर नेत्यांचा मार्ग रोखला गेला असून राजकीय समीकरणांना वेगळे वळण मिळाले आहे.

दिग्गजांची अडचण आणि कुटुंबातील चेहऱ्यांना संधी

या निर्णयामुळे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि खासदार नितीन पाटील यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना संचालक मंडळातून बाहेर राहावे लागणार आहे. त्यामुळे आता संबंधित नेत्यांच्या घरातील सदस्यांना अथवा निकटवर्तीयांना संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे.

श्रीमंत रामराजे यांनी फलटण तालुका सोसायटी आणि कृषी प्रक्रिया अशा दोन मतदारसंघांतून अर्ज भरला होता. मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांचा मार्ग बंद झाला असून कृषी प्रक्रिया मतदारसंघातून आमदार अतुल भोसले यांचा मार्ग सुकर मानला जात आहे. तर फलटण सोसायटी मतदारसंघात आता नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर असा थेट सामना रंगणार आहे.

खरेदी विक्री संघातून विश्वास (बापू) निंबाळकर बिनविरोध होणार?

जिल्हा खरेदी विक्री मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते विश्वास (बापू) निंबाळकर आणि मंत्री मकरंद पाटील या दोघांचेच अर्ज आहेत. मकरंद पाटील यांना दहा वर्षे पूर्ण झाली नसली, तरी त्यांचे बंधू खासदार नितीन पाटील अपात्र ठरल्याने मकरंद पाटील वाई सोसायटी मतदारसंघातून लढणार की खरेदी विक्री संघातून, याकडे लक्ष लागले आहे. मकरंद पाटील यांनी वाईतून लढण्याचा निर्णय घेतल्यास विश्वास (बापू) निंबाळकर बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

या सोबतच, नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघातून माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर रिंगणात असल्याने अर्ज माघारीच्या दिवशी अंतिम लढतींचे चित्र स्पष्ट होईल.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!