
थेट WhatsApp वर मिळवा
राज्यातील देशासाठी सेवा बजावलेल्या माजी अग्निवीरांना राज्य सरकारच्या गणवेशधारी सेवांमध्ये सामावून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात २८२ नौदल अग्निवीरांना थेट पोलिस शिपाई पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २३ ऑक्टोबर : देशासाठी सेवा बजावलेल्या माजी अग्निवीरांना राज्य सरकारच्या गणवेशधारी सेवांमध्ये सामावून घेण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत, पहिल्या टप्प्यात २८२ माजी अग्निवीरांना थेट शासकीय नोकरीत नियुक्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली असून, राज्य शासनाच्या या निर्णयामुळे तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शासकीय नोकरीत १० टक्के समांतर आरक्षण
केंद्र शासनाच्या अग्निपथ सैन्यभरती योजनेंतर्गत चार वर्षांची सेवा पूर्ण करून परतलेल्या माजी अग्निवीरांना राज्य सरकारने गृह, वन, नगर विकास आणि राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत येणाऱ्या गणवेशधारी गट-क सेवांमध्ये १० टक्के समांतर आरक्षण दिले आहे. या निर्णयानुसार विविध परीक्षांच्या लेखी परीक्षेसह शारीरिक चाचणी आणि वयोमर्यादेत विशेष सवलत देण्यात आली आहे.
पहिली यादी प्राप्त आणि नियुक्तीचे आदेश
पहिल्या टप्प्यात सेवानिवृत्त झालेल्या राज्यातील २८२ नौदल अग्निवीरांची यादी राज्य सरकारला प्राप्त झाली होती. यामध्ये १५० खलाशी डेकसाईड आणि १३२ खलाशी इंजिनसाईड असलेल्या माजी अग्निवीरांचा समावेश आहे. या सर्व २८२ जणांना पोलिस शिपाई पदावर नियुक्ती देण्यात आली असून प्रशासनाकडून तसे अधिकृत आदेशही जारी करण्यात आले आहेत.





