
थेट WhatsApp वर मिळवा
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड समोर आली असून, १० जिल्हास्तरीय जागांचा ५०-५० फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळत आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २१ ऑक्टोबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत राजकीय हालचालींना वेग आला असून, जिल्हास्तरीय १० जागांचे महत्त्वपूर्ण वाटप निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या समीकरणानुसार जिल्हास्तरीय १० जागांपैकी ५ जागा भारतीय जनता पार्टीला, तर उर्वरित ५ जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना यांच्या वाट्याला जाणार असल्याचे अंतिम झाले आहे.
सोसायटी मतदारसंघात स्थानिक पातळीवर लढती
प्राप्त माहितीनुसार, विकास सेवा सोसायटी मतदारसंघांमधील लढती या कोणत्याही पक्षाच्या वरिष्ठ तडजोडीनुसार न होता स्थानिक पातळीवरील ताकदीनुसारच थेट होणार आहेत. सोसायटी मतदारसंघांतील राजकीय वातावरण आधीच तापले असून, प्रत्येक तालुक्यात स्थानिक नेते आपले स्वतंत्र वर्चस्व सिद्ध करण्यासाठी रिंगणात उतरल्याचे दिसत आहे.
दुपारी ३ वाजेपर्यंत अंतिम चित्र स्पष्ट होणार
निवडणूक प्रक्रियेतील अर्ज माघारी घेण्याचा दिवस निर्णायक ठरणार असून, दुपारी ३ वाजेपर्यंत या निवडणुकीचे संपूर्ण चित्र अधिकृतरीत्या समोर येईल. दिग्गज नेते रिंगणात कायम राहतात की काही अनपेक्षित माघारी घडतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून सहकार वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.





