सातारा जिल्हा बँकेत रणजितदादा बिनविरोध

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. २१ ऑक्टोबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ऐतिहासिक आणि मोठा विजय संपादन केला आहे. जिल्हा बँकेच्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘नागरी बँक, नागरी सहकारी पतसंस्था’ मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून रणजितदादांची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी या मतदारसंघातील इतर सर्वच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सातारा जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजल्यापासूनच रणजितदादांच्या भूमिकेकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. त्यांनी थेट निवडणूक रिंगणात उतरून ‘नागरी बँक व पतसंस्था’ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या राजकीय वजनामुळे आणि महायुतीतील भक्कम समन्वयामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. परिणामी, कोणतीही लढत न होता रणजितसिंह नाईक निंबाळकर हे बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले असून, केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता शिल्लक राहिली आहे.

फलटण तालुक्यात विधानसभा, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा सर्वच निवडणुकांमध्ये ऐतिहासिक सत्तांतर घडवून आणत विजयाची मालिका रचणाऱ्या रणजितदादांनी आता जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सर्वोच्च सत्ताकेंद्र असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतही थेट बिनविरोध प्रवेश केला आहे. या विजयामुळे महायुतीची ताकद अधिक भक्कम झाली असून, संपूर्ण सातारा जिल्ह्यात भाजप आणि रणजितदादा समर्थक कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि फटाक्यांची आतिशबाजी करत जल्लोष साजरा केला आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!