
सातारा जिल्ह्यातील सीएनजी पंपांवर रिक्षांसाठी स्वतंत्र रांग करण्यात यावी, अशी मागणी रिक्षाचालकांनी केली असून तसे न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १ जुलै : सातारा जिल्ह्यातील सीएनजी पंपांवर रिक्षांसाठी स्वतंत्र रांग करण्यात यावी, अशी मागणी रिक्षाचालकांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देण्यात आले असून, मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा रिक्षाचालकांनी दिला आहे.
वेळेचा अपव्यय आणि आर्थिक फटका
सुशिक्षित बेरोजगार आणि सर्वसामान्य युवक बँकेचे कर्ज काढून रिक्षा व्यवसाय करत आहेत. वाढत्या पेट्रोल दरामुळे आणि कमी मायलेजमुळे पेट्रोल रिक्षाने व्यवसाय करणे परवडत नाही. त्यामुळे जिल्ह्यात सीएनजी रिक्षांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मात्र, जिल्ह्यात सीएनजी पंपांची संख्या अत्यंत कमी असून, अनेकदा पंपांवर सीएनजी उपलब्ध नसतो.
जेव्हा सीएनजी उपलब्ध असतो, तेव्हा वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. यामध्ये रिक्षाचालकांना चार ते पाच तास रांगेत उभे राहावे लागते. परिणामी, व्यवसाय बुडत असल्याने कर्जाचे हप्ते भरणे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.
तातडीच्या सेवेला फटका
अडचणीच्या वेळी रुग्णांना रिक्षातून रुग्णालयात न्यावे लागते, तसेच प्रवाशांना तातडीची सेवा द्यावी लागते. अशा वेळी सीएनजी भरण्यासाठी तासनतास थांबणे शक्य होत नाही. या सर्व अडचणींचा विचार करून सातारा शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील सीएनजी पंपांवर रिक्षांसाठी स्वतंत्र रांग करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
ही व्यवस्था न केल्यास रिक्षाचालकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. हे निवेदन देताना सातारा शहर व जिल्ह्यातील रिक्षाचालक आणि मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.