
लेखक सचिन गोसावी यांच्या ‘भावकी : एक न उकललेलं गूढ’ या प्रेरणादायी पुस्तकाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जलमंदिर पॅलेस येथे प्रकाशन झाले.
स्थैर्य, फलटण, दि. १ : लेखक सचिन गोसावी लिखित ‘भावकी : एक न उकललेलं गूढ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे पार पडला. प्रकाशनपूर्व चांगला प्रतिसाद मिळालेल्या या पुस्तकातून समाजपरिवर्तनाचा आणि भावकीतील वाद मिटवण्याचा मार्ग दाखवण्यात आला आहे.
भांडण मिटवणारे पुस्तक
या पुस्तकाच्या माध्यमातून सचिन गोसावी यांनी एका ज्वलंत विषयावर निर्भीड लेखन केले आहे. हे पुस्तक भावकीत भांडण लावणारे नसून, ते मिटवणारे आहे. त्यामुळे या पुस्तकाची वाटचाल निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वास यावेळी खासदार भोसले यांनी व्यक्त केला. या सोहळ्याला साहित्यिक आकाश आढाव, कवयित्री प्रतीक्षा आढाव, प्रवीण मोरे, प्रतिभा भारती-गोसावी आदी उपस्थित होते.
तरुणांसह समाजाला दिशादर्शक
आपल्याच जवळच्या माणसांमुळे येणारे नैराश्य दूर करून आयुष्याचा नवा मार्ग कसा शोधावा, यावर या पुस्तकात भाष्य करण्यात आले आहे. समाजपरिवर्तन आणि प्रबोधनाच्या उद्देशाने लिहिलेले हे पुस्तक तरुणांसोबतच समाजातील प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक ठरेल, असे मत लेखक गोसावी यांनी मांडले.
मागील पुस्तकांनाही मोठा प्रतिसाद
गोसावी यांची यापूर्वीही अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या ‘आरंभ है प्रचंड’ या पुस्तकाच्या २५ हजारांहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे. तसेच, ‘आरोग्यातून यशाकडे’ या पुस्तकाची राज्य शासनाकडून अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. एक प्रेरक व्याख्याते म्हणूनही त्यांच्या कार्याला राज्यभरातून मोठी मागणी आहे.
