दैनिक स्थैर्य | दि. २८ मे २०२३ | फलटण |
आनंदी जीवनासाठी विरंगुळा फार महत्त्वाचा आहे. तो आपल्याला विविध माध्यमातून मिळतो. निसर्ग आणि साहित्य यातून अधिक विरंगुळा मिळतो, म्हणून निसर्ग वाचवला पाहिजे व साहित्य मनापासून वाचले पाहिजे. प्रत्येकाने आनंदाचे झाड आपल्या मनाच्या अंगणात लावले तर निसर्ग आणि साहित्यातून मनसोक्त विरंगुळा मिळतो. त्यासाठी आजूबाजूला जे दिसते त्याचे प्रतिबिंब साहित्यात दिसले पाहिजे, असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केले.
साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण व वन विभाग फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या साहित्य संवाद कार्यक्रमात नाना नानी पार्क, फलटण येथे ते बोलत होते. यावेळी संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, प्रा. विक्रम आपटे, लेखिका सौ. सुलेखा शिंदे, रानकवी राहुल निकम, युवा साहित्यिक विकास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रविंद्र बेडकिहाळ पुढे म्हणाले की, लिहित्या हाताला बळ देण्याचे काम साहित्य संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून केले जाईल. साहित्याला जातपात नसते, साहित्य भावनिक विश्व निर्माण करते. त्यामुळे लिहिलेल्या साहित्याला योग्य प्रसिद्धी दिली जाईल.
साहित्य संवाद कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य संवाद कार्यक्रमाचे संयोजक, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणचे कार्यवाह व साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटणचे अध्यक्ष ताराचंद्र आवळे यांनी करून साहित्य व साहित्यिक संवाद या कार्यक्रमाची आजची गरज तसेच नियमित वाचनाचे लिखाणासाठी होणारे फायदे व मुक्त संवाद याविषयी माहिती सांगून ‘मेंढका’ या कादंबरीचे विवेचन केले.
युवा साहित्यिक विकास शिंदे यांनी साहित्य संमेलनाबरोबर पत्रकार साहित्य संमेलन घ्यावे, याविषयी आपली स्पष्ट भूमिका मांडली. तसेच परिसंवाद म्हणजे काय, हे सांगून वाचनाने माणूस कसा घडतो, याची उदाहरणे दिली.
यावेळी प्रा. विक्रम आपटे यांनी ‘ते पंधरा दिवस’, लेखिका सौ. सुलेखा शिंदे यांनी ‘प्रकाशवाटा’, सौ. अनिता पंडित यांनी ‘भगवतगीता’, अमर शेंडे यांनी ‘यशवंतराव चव्हाण विचारधन-एक सुवर्ण ठेवा’ तसेच ‘पाहिले सचित्र वृत्तपत्र’ आणि अॅड. रोहिणी भंडलकर यांनी ‘मृत्यूंजय’ या पुस्तकांचे प्रभावी विवेचन करून वाचनाचे महत्त्व सांगितले. रानकवी राहुल निकम यांनी ‘झाड’ व ‘काळजातील कविता’, कवी अतुल चव्हाण यांनी ‘पैसा’ व ‘आयुष्य म्हणजे काय असते’, प्रा.अशोक माने यांनी ‘हिरव्या मळ्यात’ या कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. सौ. अलका बेडकिहाळ यांनी जुन्या काळातील व आधुनिक काळातील प्रिंटींग, याविषयी माहिती दिली.
यावेळी साहित्य संवाद कार्यक्रमासाठी वनअधिकारी नितीन बोडके, सचिन जाधव, श्याम आहिवळे, मुख्याध्यापक भिवा जगताप, राजेश पवार, शितल नडगिरे, ज्योती मुजूमदार, अश्विनी मोरे, नितेश पिसे, मदन नागरगोजे, गौरव बुधनवर, आकाश आडके, मयूर शेरखाने तसेच साहित्यप्रेमी व निसर्ग सोबती ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. दर महिन्याला होणार्या या साहित्य संवाद कार्यक्रमाचे साहित्य क्षेत्रातून कौतुक होत आहे.