
थेट WhatsApp वर मिळवा
सांगवीत श्री दुर्गामाता दौडमध्ये सहभागी धारकऱ्यांवर एका महिलेने काठीने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २० ऑक्टोबर : फलटण तालुक्यातील सांगवी येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित श्री दुर्गामाता दौडमध्ये एका महिलेने सहभागी धारकऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
‘रस्त्यावर कशाला येता?’ म्हणत हल्ला
सांगवी येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्री दुर्गामाता दौड काढण्यात आली होती. ही दौड मार्गावरून जात असताना एका महिलेने दौडमध्ये अडथळा निर्माण केला. “ही दौड कशासाठी काढत आहात? तुमच्या देवाचे देवळात करा, रस्त्यावर कशाला येत आहात?” असे प्रश्न विचारत या महिलेने थेट काठीने दौडमधील लहान मुले व धारकऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या घटनेची माहिती मिळताच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या फलटण तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि धारकऱ्यांनी तातडीने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी संबंधित महिलेवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करत कार्यकर्त्यांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलिसांत अधिकृत नोंद झाल्यानंतर या प्रकरणाची अधिक सविस्तर माहिती समोर येणार आहे.




