
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण नगरपरिषदेच्या वतीने दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना एक महत्त्वपूर्ण पर्यावरणपूरक आवाहन करण्यात आले आहे. शहरात देवीच्या मूर्तींचे कमी पाणी असलेल्या जलाशयात विसर्जन न करता त्या नगरपरिषदेकडे सुपूर्द कराव्यात, जेणेकरून जलस्रोतांचे संरक्षण व पाण्याची बचत होऊ शकेल.
स्थैर्य, फलटण, दि. २० ऑक्टोबर : सध्या निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेता, सार्वजनिक व घरगुती देवीच्या मूर्तींचे विसर्जन कमी पाणीसाठा असलेल्या पाण्यात न करता त्या फलटण नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे पाण्याची बचत होण्यास मदत होणार असून, उपलब्ध जलसाठ्यांचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक उपक्रमाची अंमलबजावणी
धार्मिक परंपरांचा आदर राखत पाण्याची बचत आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. फलटण शहरातील सर्व सार्वजनिक मंडळे, घरगुती देवीची प्रतिष्ठापना करणारे नागरिक आणि भाविकांनी मूर्तींचे थेट विसर्जन टाळून त्या नगरपरिषदेकडे सुपूर्द कराव्यात. मूर्ती स्वीकारल्यानंतर काही दिवसांनी योग्य व्यवस्था करून नियमानुसार व पावित्र्य राखून त्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.
संपर्क व मूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था
नगरपरिषदेकडून मूर्ती स्वीकारण्याची अधिकृत व्यवस्था फलटण नगर परिषद जलशुद्धीकरण केंद्र, सोमवार पेठ, फलटण येथे करण्यात आली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी विनोद जाधव (९८६०८५०३५०), तात्या घोलप (७०२०५९८३६२) आणि अक्षय राक्षे (७३८५०७७३६९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष प्रियदर्शनी भोसले आणि पाणी पुरवठा विभाग सभापती राहुल निंबाळकर यांनी केले आहे.





