दैनिक स्थैर्य | दि. ११ मार्च २०२४ | फलटण |
फलटण येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांची भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी आज नियुक्ती करण्यात आली. भाजपा अल्पसंख्यांक आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष व म्हसवड नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते अकिल मैनुद्दीन काझी यांनी सागर शहा यांना नियुक्तीचे पत्र प्रदान केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी आपण काम करून भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य कराल, असा विश्वास व्यक्त करून सागर शहा यांना पुढील कारकीर्दीसाठी काझी यांनी शुभेच्छा दिल्या.
सागर शहा यांनी पूर्वी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम केलेले आहे.
गत काही वर्षांपूर्वी सागर शहा यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता.
खासदार रणजितसिंह यांचे बंधू तथा फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह निंबाळकर यांचे ते विश्वासू सहकारी आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून सागर शहा हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची खिंड कायम लढवत असतात.
सागर शहा यांचा दांडगा जनसंपर्क व उद्योगात मोठी भरारी असल्याने आगामी काळामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून फलटण नगर परिषदेचे तिकीटसुद्धा त्यांना मिळू शकते.