दैनिक स्थैर्य | दि. 11 मार्च 2024 | फलटण | आगामी माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार महादेव जानकर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. महादेव जानकर यांना लोकसभेवर निवडून देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष तयारीला लागला असून त्यांच्यासाठी फलटण तालुक्यात जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निहाय घोंगडी बैठका राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी घेत आहेत. महादेव जानकर यांनी आपला प्रचार सुरु केला असला तरी त्यांच्यासमोर नक्की कोण उमेदवार उभा ठाकणार ? हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली आहे. विविध लोकसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवारांनी आपले प्रचार सुरु केले आहेत. त्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे सुद्धा चांगलेच तयारीला लागले आहेत. भारतीय जनता पार्टीवर नाराज असलेल्या दिगज्ज नेत्यांच्या समवेत महादेव जानकर हे “चाय पे चर्चा” करीत आहेत. तर काही वेळा माढा लोकसभेतील दिग्ग्ज नेत्यांच्या समवेत थेट विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकांचा सपाटा लावला आहे.
हे सर्व सुरु असताना महाविकास आघाडी सोबत सुद्धा महादेव जानकर यांचे बोलणे सुरु आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासमवेत महादेव जानकर यांचे बोलणे झाले असल्याचे समोर येत आहे. महाविकास आघाडी माढा लोकसभा महादेव जानकर यांना सोडण्यासाठी तयार असल्याचे यामधून कळत आहे.
तरी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर हे माढा मतदारसंघातून लोकसभा लढवणार असल्याने अनेकांचे टेन्शन वाढले आहे. तर स्वतः जानकर यांनी उमेदवारीची घोषणा केल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना लोकसभेवर पाठवण्यासाठी कंबर कसली असल्याचे चित्र दिसून येत आहे.