फलटणचे माजी प्रांताधिकारी सचिन ढोले आता रायगडचे अपर जिल्हाधिकारी; शासनाचे आदेश जारी

फलटणचे माजी प्रांताधिकारी सचिन ढोले यांची शासनाने रायगडचे अपर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या नव्या निवडीबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १९ ऑगस्ट : फलटणचे माजी प्रांताधिकारी आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेले सचिन भानुदास ढोले यांची शासनाने रायगडचे अपर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. नागपूर येथून त्यांची रायगडला बदली झाली असून महसूल विभागाने यासंदर्भातील अधिकृत आदेश काढले आहेत.

शासनाचे अधिकृत आदेश

सचिन ढोले हे सध्या नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे सह आयुक्त म्हणून कार्यरत होते. प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने शासनाने त्यांना आता रायगड जिल्ह्याची मोठी जबाबदारी दिली आहे. महसूल विभागाचे उपसचिव महेश वरूडकर यांनी त्यांच्या बदलीचे आदेश जारी केले असून, ढोले यांना तात्काळ नव्या पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

फलटणमधील संस्मरणीय कार्यकाळ आणि पुढील वाटचाल

सचिन ढोले यांचा फलटण येथील उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) पदाचा दीड वर्षांचा कार्यकाळ अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला होता. त्यांनी फलटण-बारामती रेल्वे व रस्ता प्रकल्पातील जमीन अधिग्रहणाचे गुंतागुंतीचे प्रश्न, तसेच सोमंथळी येथील प्रश्न शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन मार्गी लावले होते. फलटणमधील यशस्वी कार्यकाळानंतर त्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, मुंबई उपनगरचे अपर जिल्हाधिकारी आणि त्यानंतर नागपूरमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या या नव्या नियुक्तीबद्दल फलटण तालुक्यातून विशेष समाधान व्यक्त केले जात आहे.

Back to top button
Don`t copy text!