
स्थैर्य, फलटण, दि. २६ जून : फलटण आणि कोरेगाव या दोन महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणाऱ्या आणि या भागाच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘कोरेगाव-फलटण’ रस्त्याच्या भाग्यबदलाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे कोरेगाव-फलटण या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या ‘ट्रीमिक्स काँक्रीटीकरणासाठी’ राज्याच्या पुरवणी अंदाजपत्रकात तब्बल २०८ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण आणि संयुक्त पाठपुराव्यामुळेच हा ऐतिहासिक निधी फलटण व कोरेगाव तालुक्यांच्या पदरात पडला आहे.
फलटण-कोरेगाव अंतर अवघ्या अर्ध्या तासावर!
या विकासकामांतर्गत चिलेवाडी ते कुमठे फाटा हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर कोरेगाव ते फलटण हे अंतर अवघ्या अर्ध्या तासात पार करता येणे शक्य होणार आहे. यामुळे फलटण आणि कोरेगाव शहरासह, मुख्य बाजारपेठ आणि दोन्ही तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या भाडळे खोऱ्याच्या विकासाला खूप मोठी चालना मिळणार आहे.
बाजारपेठांशी थेट संपर्क अन् वेळेची बचत
या रस्त्याच्या दर्जेदार काँक्रीटीकरणामुळे कोरेगाव ते वाठार स्टेशन आणि पुढे फलटण हा प्रवास अत्यंत सुखकर व कमी वेळेत होणार आहे. याचा थेट फायदा फलटण आणि कोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांना होणार असून, त्यांचा शेतीमाल व भाजीपाला पुणे, मुंबई, नाशिक आणि चाकणसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये अत्यंत जलद गतीने पोहोचवणे शक्य होईल. परिणामी, फलटण शहराची बाजारपेठ सुद्धा व्यापारीदृष्ट्या अधिक सक्षम होणार आहे.
रस्त्यांसोबत पाण्याचा प्रश्नही सुटणार (भाडळे खोऱ्याला मोठा दिलासा)
या भागामध्ये रस्ते विकासाबरोबरच पाणी प्रश्नावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत कृष्णा नदीचे पाणी रामोशीवाडी, भाडळे तलाव, नलवडेवाडी तलाव आणि तळहिरा तलावापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. या माध्यमातून २२ हजार ५०० हेक्टर ऊसाचे नवीन क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट असून, यामुळे विशेषतः भाडळे खोरे आणि उत्तर भागातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.
महामार्गांचे जाळे पूर्णत्वाकडे
कोरेगाव, वाई, वाठार स्टेशन, लोणंद, फलटण आणि कराड या प्रमुख शहरांना उच्च दर्जाच्या आणि दर्जेदार रस्त्यांद्वारे जोडण्याचे नियोजन आता अंतिम टप्प्यात आले आहे. मूलभूत असणाऱ्या रस्ते आणि पाणी या दोन्ही प्रश्नांवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार महेश शिंदे या दोन्ही नेत्यांनी मिळून केलेल्या भक्कम कामगिरीमुळे फलटण व कोरेगाव तालुक्यांतील नागरिकांमध्ये अत्यंत समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
