साताऱ्यात ११५ कोटी रुपयांचे ‘सीट्रिपल’आयटी’ सेंटर मंजूर

ना. शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा; टाटा टेक्नॉलॉजी आणि राज्य शासनाच्या सहकार्याने उभारणार केंद्र

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. 9 डिसेंबर :  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून सातारा जिल्ह्यासाठी ११५ कोटी खर्चाचे ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अँड ट्रेनिंग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’ केंद्र मंजूर झाले आहेत. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने केंद्र मंजुरीचे पत्र राज्य शासनाला पाठवले असून टाटा आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून सातारा येथे हे नवीन केंद्र लवकरच उभे राहणार आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील युवकांना उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञानासह रोजगाराभिमुख कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र मंजुरीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी दोघांचेही आभार मानले आहेत.

सातारा येथे होणाऱ्या या ‘सीट्रिपलआयटी’ केंद्राच्या एकूण ११५ कोटींच्या खर्चापैकी ९७ कोटी ७५ लाख रुपये टाटा कंपनीतर्फे तर, १७ कोटी २५ लाख रुपये राज्य शासनाकडून उपलब्ध करण्यात येणार आहेत. साताऱ्यासाठी ‘सीट्रीपलआयटी’ केंद्र मंजूर करुन आणल्यामुळे जिल्ह्यातील युवकांना रोजगाराभिमुख अत्याधुनिक कौशल्यविकासाचे प्रशिक्षण मिळण्याचा तसेच जिल्ह्यामध्ये उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या ‘सीट्रीपलआयटी’ केंद्रामुळे सातारा जिल्ह्यातील युवकांना ‘एआय’ वापरासह जागतिक दर्जाचे आधुनिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्य विकासाची, रोजगार, स्वयंरोजगाराची संधी मिळणार आहे. उद्योगक्षेत्राला स्थानिक पातळीवर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासह अनेक उद्दिष्टांची पूर्तता या ‘सीट्रीपलआयटी’ केंद्रामुळे होणार आहे. नागेवाडी, सातारा येथे आयटी पार्क उभारणीसाठी ना. शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा सुरु असून त्याची काही दिवसांपूर्वीच अधिसूचना काढण्यात आली होती. आता साताऱ्यासाठी नवीन सेंटर मंजूर झाल्याने ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळे जिल्ह्यातील युवकांसाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे.

‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने राज्य शासनाला पाठवलेल्या पत्रात, सातारा येथे राज्य शासनाच्या मदतीने ११५ कोटी रुपये खर्चून नवीन ‘सीट्रिपलआयटी’ स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे कळवले आहे. टाटा टेक्नॉलॉजी आणि राज्य शासन यासाठी निधी उपलब्ध करणार असून या नव्या सेंटरमधून दरवर्षी ३ हजार युवकांना प्रशिक्षित केले जाईल, त्यातून जिल्ह्यात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. हे सेंटर मंजूर केल्याबद्दल जिल्हावासियांमधून समाधान व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!