बिरदेव यात्रेवर प्रशासनाचा मोठा निर्णय; वाद्य वाजवणे आणि प्राणी बळी देण्यास बंदी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

जाधववाडी येथील बिरदेव यात्रेत संभाव्य वाद आणि कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वाद्य वाजवण्यास आणि प्राणी बळी देण्यास मनाई आदेश जारी केले आहेत.

स्थैर्य, फलटण, दि. २२ ऑक्टोबर : फलटण तालुक्यातील जाधववाडी येथील श्री बिरदेव देवस्थानच्या आश्विन कोजागिरी पौर्णिमा यात्रेत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी कडक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. यात्रेदरम्यान मंदिर परिसरात एकत्र येणे, वाद्ये वाजवणे तसेच प्राण्यांचा बळी देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

दोन गटांतील वाद आणि खबरदारी

जाधववाडी येथील श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टच्या यात्रेला धनगर, माळी, रामोशी समाजासह विविध भागांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या यात्रेच्या अनुषंगाने दोन गटांमध्ये यापूर्वी गंभीर वाद आणि हाणामारीचे प्रकार घडले होते. दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये पुन्हा तणाव निर्माण होऊन सार्वजनिक शांतता धोक्यात येऊ नये, यासाठी फलटण शहर पोलीस स्टेशनच्या अहवालानुसार हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.

प्रशासनाकडून मनाई आदेश जारी

उपविभागीय दंडाधिकारी प्रियांका आंबेकर यांनी यात्रेच्या कालावधीत भाविकांची सुरक्षा आणि सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण व्हावे म्हणून हे आदेश दिले आहेत. मंदिर परिसरात गर्दी जमवणे, वाद्ये वाजवणे आणि प्राण्यांचा बळी देणे यावर पूर्ण निर्बंध राहतील. हे निर्बंध केवळ यात्रा परिसरासाठी लागू असून, श्रींच्या नेहमीच्या धार्मिक विधी व परंपरेला कोणतीही बाधा येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!