दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑगस्ट २०२२ । सातारा । सातारा शहर व परिसरातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचा उपक्रम सातारच्या रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने सुरू आहे. तो अत्यंत महत्त्वपूर्ण व स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन सौ शारदा शिंत्रे यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट , सातारा यांच्या वतीने बालवाडी ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत समारंभ समर्थ सदन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी शारदा शिंत्रे या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी मुख्य ट्रस्टी व चित्रपट निर्माते अरुण गोडबोले होते. यावेळी सौ निर्मला लेवे , सौ अंजली निगडीकर , सौ.शैला आपटे , सौ.अनुपमा गोडबोले यांच्या हस्ते ही मदत प्रदान करण्यात आली. यावेळी पाहुण्यांनी सर्व मुलांना मदतीचा सुयोग्य वापर करा असे सांगून शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
सातारचे माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शैक्षणिक मदत वाटपाचे हे ५१ वे वर्ष असल्याचे प्रास्ताविकात डॉ. अच्युत गोडबोले यांनी सांगितले. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना अशा प्रकारची शैक्षणिक मदत या ट्रस्टमार्फत केल्याची डॉ अच्युत गोडबोले यांनी सांगितले. गोडबोले परिवाराच्या वतीने पाहुण्यांना पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले.
बालवाडी ते चौथीच्या शंभर मुलांना शैक्षणिक मदत प्रदान करण्यात आली. प्रद्युम्न गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अशोक गोडबोले , उदयन गोडबोले , डॉ चैतन्य गोडबोले , आर्यन गोडबोले उपस्थित होते.