तांदळाच्या साठेबाजीला पुन्हा उधाण; परराज्यातील आवक वाढल्याने प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

कमी पर्जन्यमानामुळे तांदळाचे दर वाढण्याच्या शक्यतेने परराज्यातून तांदूळ आयात करून साठेबाजी सुरू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २२ नोव्हेंबर : चालू खरीप हंगामात कमी पर्जन्यमानामुळे अन्नधान्य उत्पादनात घट होऊन तांदळाचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर काही राईस मिल मालक आणि व्यावसायिकांनी परराज्यातून तांदूळ आयात करून साठेबाजी सुरू केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

परराज्यातून पुन्हा तांदळाचे ट्रक दाखल

मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि हरियाणा राज्यांचे पासिंग क्रमांक असलेले तांदळाने भरलेले ट्रक कोहमारा, चिखली, सौंदड आणि कोकणा परिसरात उतरवले जात होते. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काही काळ ही वाहतूक मंदावली होती, मात्र आता पुन्हा परराज्यातील ट्रक हळूहळू दिसू लागले आहेत. हमीभाव धान खरेदी योजनेतील धानाची भरडाई करण्याऐवजी बाजारातून रेशनचा तांदूळ घेऊन शासकीय गोदामात जमा केला जात असल्याची व त्याच तांदळाची साठेबाजी होत असल्याची शंका नागरिकांमधून उपस्थित केली जात आहे.

बाजार समितीचे नियम आणि शासनाचे कडक निर्देश

कृषी उत्पन्न खरेदी-विक्री नियमांनुसार, बाजार क्षेत्रात खासगी व्यापाऱ्यांनी किंवा प्रक्रिया उद्योगांनी शेतीमाल गोदामात साठवल्यास किंवा आयात केल्यास त्याची माहिती बाजार समितीला देणे आणि नियमानुसार बाजार फी भरणे आवश्यक असते. दुसरीकडे, देशांतर्गत तांदळाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने साठा निर्बंध लागू केले आहेत. या निर्देशांनुसार व्यापारी, घाऊक विक्रेते आणि राईस मिलर्सना दर शुक्रवारी आपल्याकडील तांदूळ व धान्य साठ्याची अचूक माहिती शासनाच्या फूड स्टॉक पोर्टलवर नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!