
थेट WhatsApp वर मिळवा
पाचगणीतील पाच हॉटेल्सच्या अचानक तपासणीत अस्वच्छता आणि मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने दोन हॉटेल्सचे परवाने निलंबित केले आहेत.
स्थैर्य,सातारा, दि. २२ नोव्हेंबर : महाबळेश्वरनंतर आता अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) आपला मोर्चा पर्यटननगरी पाचगणीकडे वळवला असून शहरातील पाच हॉटेल्सची अचानक तपासणी केली आहे. या तपासणीदरम्यान दोन हॉटेल्समध्ये गंभीर स्वरूपाची अस्वच्छता आणि मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळून आल्याने त्यांचे अन्न विक्री परवाने ठराविक कालावधीसाठी निलंबित करण्यात आले, तर अन्य तीन हॉटेल्सना अनियमिततेबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्याने परवाने निलंबित
सहाय्यक आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही मोहीम राबवली. तपासणीदरम्यान शॉपिंग सेंटर परिसरातील राधा कृष्ण फूड कोर्ट आणि खिंगर रोडवरील समर प्लाझा या दोन आस्थापनांमध्ये स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आणि मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळून आले. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाने दोन्ही हॉटेल्सचे परवाने तात्काळ निलंबित केले आहेत.
तीन हॉटेल्सना नोटिसा; व्यावसायिकांमध्ये खळबळ
या मोहिमेअंतर्गत नारायण लॉज परिसरातील क्लिफ इन, खिंगर रोडवरील ब्लू कंट्री आणि शॉपिंग सेंटरमधील फ्रेंच ट्रीट या तीन हॉटेल्समध्येही स्वच्छतेबाबत अनियमितता आढळल्याने त्यांना सुधारणा करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एफडीएच्या या धडक कारवाईमुळे पाचगणीतील हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.



