
स्थैर्य, जालना, दि.२४ : एकीकडे कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर दुसरीकडे पुन्हा निर्बंध लागू करणार असल्याची मोठी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत असल्याने राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असून निर्बंध लावण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही इच्छा असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. ते जालन्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते.
लॉकडाऊन नसला तरी शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याने राज्य सरकार हा कठोर निर्णय घेणार आहे. यावर पुढच्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर घोषणा होणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.
प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांना शोधण्यात पुणे पोलिसांना ३३ दिवसांनंतर यश
आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक ठिकाणी नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळताना दिसत नाही. मास्क वापरले जात नाहीत. त्यामुळे आपल्याला काही कडक पावलं टाकावीच लागतील. सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत आहेत. त्यामुळे तिथे जे निर्बंध शिथिल केले होते ते पुन्हा लावावे लागतील, असे टोपे म्हणाले.
पुनर्वसन मंत्र्यांनीही दिले संकेत
मागील आठवड्यात राज्यातील रुग्णसंख्येने ५ हजारांच्या सरासरीने उसळी घेतल्याने राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. तसे संकेत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. ‘राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जातोय. आठ दिवस अंदाज घेऊन काही निर्बंध आणता येतील का? याचा विचार सुरु आहे. शेवटी जीव वाचवणं महत्त्वाचं आहे,’ अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. राज्यात कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी घेणं महत्वाचं आहे. सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. सर्व अभ्यास करुन निर्णय घेतले जातील. मुंबई कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. अनेक राज्यांमधून इथे लोक येतात. त्यामुळे पुढचे आठ दिवस परिस्थिती पाहिली जाईल. त्यानंतर रेल्वे आणि विमानसेवा, तसेच क्वारंटाईनबाबत काही कडक निर्बंध आणावे लागतील, असे वडेट्टीवार म्हणाले.