वडिलांची मुलाखत घेऊन ’रयतधारा’ हे चरित्र लिहिले – संशोधक प्रा.डॉ.अरुण घोडके


दैनिक स्थैर्य । दि. १६ जानेवारी २०२३ । सातारा । कर्मविरानी आयुष्यात कोणताही अहंकार न बाळगता सर्व आयुष्यभर रयतसेवक म्हणून जनतेची सेवा.केली. रयत शिक्षण संस्थेलाच त्यांनी पांडुरंग मानले. रयत शिक्षण संस्था ही कर्मवीरांची विचारधारा आहे. कर्मवीर अण्णांच्याबद्दल आयुष्यभर कृतज्ञता ठेवून माझ्या वडील बाबुराव कृष्णात घोडके यांनी काम केले. ते हयात असताना मा.भि.काटकर यांचे ‘कर्मवीर माझे दैवत’ हे पुस्तक माझ्या वाचनात आले. या पुस्तकात माझ्या वडिलांनी केलेल्या कामाची नोंद असलेली दोन पाने सापडली. ती माझ्या वडिलाना दाखवली. त्यानंतर त्यांनी कर्मवीर अण्णांच्या अनेक आठवणी मला सांगितल्या. ऐतवडे येथे येऊन कर्मवीर अण्णांनी माझ्या जनावरांचे डॉक्टर झालेल्या वडिलाना दहिवडी येथे नेले. शिप फार्मचे मॅनेजर केले. लोक त्यांना घोडकेसाहेब म्हणत. १५-२० वर्षाचा काळ रयत शिक्षण संस्थेत गेला. मी वडिलांची मुलाखत घेत गेलो तेंव्हा कर्मवीरांच्या आजवर कोणासही माहित नसलेल्या अनेक आठवणी आपल्याला मिळाल्या. पुस्तक लिहिल्यासाठी इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले. त्यातूनच ‘रयतधारा ‘हे पुस्तक निर्माण झाले. असे मत पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिध्द वक्ते प्रा.डॉ.अरुण घोडके यांनी व्यक्त केले. ते येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभाग ,कमवा व शिका विभाग व विद्यार्थिनी वसतिगृह विभागाने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित केलेल्या’ व्याख्यान व मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कमवा आणि शिका योजनेचे प्रमुख उपप्राचार्य डॉ.रामराजे माने देशमुख होते. मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे, प्रा.सुकुमार शेटे,प्रा.संदीप भुजबळ,यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांचे मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. कर्मवीर अण्णांचा सहवास व संस्कार वडिलाना लाभला त्यामुळे वडिलांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाल्याचे सांगताना त्यांनी सांगितले की’’ कर्मवीरांनी वडिलाना दहिवडीच्या शिप फर्मची जबाबदारी दिली असली तरी माणचे कडक उन,व भोंडा माळ पाहून न करमल्याने सुरुवातीला नोकरीचा राजीनामा देऊन वडील बाहेर पडले होते. हेरले येथे मामाच्या गावी जाऊन राहिले होते,पण कर्मवीरांनी तेथे जाऊन त्यांना पुन्हा दहिवडी येथे नेले. तिथे पुन्हा वडिलांनी निष्ठेने सेवा केली. तिथेच संसार उभा राहिला. दहिवडी ,माणदेश यावर अण्णांचे खूप प्रेम होते. असेही त्यांनी सांगितले. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे निधनाची वार्ता ऐकून कर्मवीरांच्या मनात दाटलेला शोक, वडिलांनी पान खाल्यानंतर कर्मवीरांनी दिलेली समज,कर्मवीर यांचे निधन झाल्यानंतर दहिवडीत वडिलांनी
बांधलेली समाधी ,हेरल्याच्या मामानी कास्याच्या तांब्यात कर्मवीरांना प्यायला दिलेले पाणी,अण्णांना जेवणात आवडणारे पदार्थ, शेळ्यामेंढ्या चोरणाराला वडिलांनी घडविलेली अद्दल, वडिलांची शिस्त, वडिलांची कामाची पद्धती, शिपफार्ममधून काढलेली लोकर आष्टा येथे नेऊन तेथे तयार केलेल्या घोंगड्या, बाळासाहेब देसाई मंत्री असताना त्यांना दिलेली घोंगडी,कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेची घोंगडी दिली म्हणून बाळासाहेब देसाई यांनी दिलेला आपला पगार, कर्मवीरांची अनुयायी शिक्षक खैरमोडे आजारपणाने अस्वस्थ असताना कोरड्या हवामानात ठेवा सांगितले म्हणून त्यांना दहिवडीत कसे ठेवले गेले ,इत्यादी अनेक प्रसंग त्यांनी भाषणात सांगितले. भाषणानंतर
घेतलेल्या मुलाखतीत प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी ‘आपण स्वतः या पुढच्या काळात कोणती विचारधारा घेऊन पुढे जाणार आहात असा प्रश्न विचारला त्यावर‘ सध्या राजकारणामुळे जाती, धर्म असे वातावरण असले तरी कर्मवीर अण्णांनी जातीपातीच्या आणि धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा मार्ग आपल्याला दिला आहे. तोच रयतेच्या हिताचा मार्ग यापुढे आपला असेल. अनेक डावे,उजवे विचारवंत मला भेटत असतात. माझ्या संशोधनात सत्यालाच महत्व आहे. पुराव्यानिशी कोणतीही गोष्ट मांडणे आवश्यक असते.शिवरायांचे,कर्मवीर यांचे मानवतावादी विचारच समाजाला उपयुक्त आहेत. ‘सेवेच्या ठायी तत्पर,हिरोजी इंदलकर’ तसे आपण सेवाभावी होऊन समाजाच्या हिताचे काम करणे हेच आज आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रा.सुकुमार शेटे यांनी बाबुराव घोडके यांच्या आठवणी सांगितल्या. लहानपणापासून अरुण माझ्यासमोर घडतो आहे, पण त्यांच्या वाचन,चिंतन मननाने एक लेखक, वक्ता होऊन समाजहिताचे तो मोठे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. रयतच्या ज्ञानाचा कवडसा अरुणच्या रयतधारेत मला दिसतो. मराठी-इंग्लिश अशी विडंबन असलेली ‘हाव टू कम कम नांदायला ‘ही कविता त्यांनी सादर केली. विनोदी शैलीतील विडंबन पाहून विद्यार्थ्यांना साहित्यातला आनंद मिळाला. अध्यक्षीय भाषणात डॉ.रामराजे माने देशमुख यांनी भूगोलातील ऋतूंचे व मराठी वर्णन मराठी काव्यात करून दिले. ते म्हणाले’’ छत्रपती शिवाजी महाराजांना भूगोल माहित होते. भूगोल हा निसर्गामध्ये वेगवेगळे रंग भरतो. भूगोलातील वर्णन साहित्यात
येते.एक कवी म्हणतो ‘चैत्र आणतो झाडांना साड्या,वैशाख ओढतो वराडाच्या गाड्या, जेष्ठ बसतो पेरीत शेती, आषाढ धरतो छत्री वरती, श्रावण लोळे गवतावरती, भाद्रपद गातो गणेशमहती, आश्विन कापतो हळवे भात,कार्तिक बसतो दिवाळी खात,मार्गशीर्ष शेकोटीत लाकडे,पौषाच्या अंगात उबदार कपडे, माघ करतो शेणी गोळा, फाल्गुन करतो अपूर्व सोहळा,वर्षाचे महिने असतात बारा,प्रत्येकाचा उद्योग न्यारा ‘’ ही कविता विद्यार्थ्यांना ते खूप भावली. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक डॉ.विद्या नावडकर यांनी केले. परिचय डॉ.कांचन नलवडे यांनी करून दिला. मराठी विभाग,कमवा शिका योजना व विद्यार्थिनी वसतिगृह विभागाकडून प्रा.अरुण घोडके यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रा.डॉ.संजयकुमार सरगडे यांनी आभार मानले.सूत्रसंचालन सोनाली जाधव व समीक्षा चव्हाण हिने केले. या कार्यक्रमास प्रा.डॉ.धनाजी मासाळ,प्रा.डॉ.दत्तात्रय कोरडे,डॉ.सीमा कदम,प्रा कु.माधुरी गोडसे,प्रा.प्रियांका कुंभार,प्रा.श्रीकांत भोकरे ,प्रा.वराडे पाटील इत्यादी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. भूगोल, इतिहास व मराठी साहित्य अशी चर्चाही या व्याख्यानात रंगली.


Back to top button
Don`t copy text!