छत्रपती शिवाजी महाराज मल्लखांब चषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी पाठपुरावा करणार – डॉ. सुरेश खाडे


दैनिक स्थैर्य । दि. १६ जानेवारी २०२३ । सांगली । महाराष्ट्रात जसे छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी व व्हॉलीबॉल चषक क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. त्या पद्धतीने पुढील वर्षी छत्रपती शिवाजी महाराज मल्लखांब चषक या स्पर्धेचे आयोजन करण्याचा पाठपुरावा करण्यात येईल व ही स्पर्धा सर्वप्रथम सांगली जिल्ह्यामध्ये घेण्यात येईल, असे आश्वासन कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी शालेय राज्यस्तरीय मल्लखांब क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी दिले.

जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्‍हा क्रीडा परिषद सांगली यांच्या विद्यमाने व सांगली जिल्हा अमॅच्युअर मल्लखांब असोसिएशन सांगली आणि मातोश्री तानुबाई दगडू खाडे, इंग्लिश स्कूल मिरज यांच्या सहकार्याने मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल मिरज येथे आयोजीत शालेय राज्यस्तर मल्लखांब क्रीडा स्‍पर्धेचे पारितोषिक वितरण काल पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी

सांगली जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष सम्राट महाडिक, सुशांत खाडे, स्वाती खाडे, बाबासाहेब समलेवाले, शिवछत्रपती पुरस्कार्थी विश्वतेज मोहिते, सुजित शेडगे, अनील नागपूरे, मोहन पाटील, मुख्याध्यापीका संगीता पाटील, पंच सुनिल गांगावणे, बाळासाहेब शिंदे, नरेंद्र भोई, विनोद वाघमारे, संदीप शिंदे, स्वप्नील खोत, तसेच सांगली जिल्हा मल्लखांब असोसिएशन चे पदाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्‍हा क्रीडा परिषद, सांगली यांच्या विद्यमाने व सांगली जिल्हा अमॅच्युअर मल्लखांब असोसिएशन, सांगली आणि मातोश्री तानुबाई दगडू खाडे, इंग्लिश स्कूल, मिरज यांच्या सहकार्याने शालेय राज्यस्तर मल्लखांब क्रीडा स्‍पर्धा (14, 17, 19 वर्षे मुले/मुली) चे आयोजन दिनांक 11 ते 13 जानेवारी, 2023 रोजी मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल, मिरज येथे करण्यात आले होते. या स्‍पर्धेसाठी महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, पुणे व यजमान कोल्हापूर विभागातील विविध जिल्ह्यातून 200 ते 250 खेळाडू मुले/ मुली व पंच, व्‍यवस्‍थापक सहभागी झालेले होते. मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल, मिरज मध्‍ये विद्यूत झोकातील सुसज्ज अशा पेंडॉल मध्ये या स्पर्धेचे नियोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेमध्ये मुलांसाठी पुरलेला मल्लखांब व मुलींसाठी दोरीचा मल्लखांब या प्रकारात स्पर्धा संपन्न झाल्या. या स्‍पर्धेमधून 14, 17, 19 वर्षे मुले व मुली या वयोगटामध्ये वैयक्तीक व सांघिक प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक काढून त्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!