रेमडेसिविर उपलब्धता वाढण्यासाठी प्रयत्न करणार – भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. २४: कोरोनावर नियंत्रण मिळवताना ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांच्या उपचारासाठी केअर सेंटर उभारणीसह बाधितांना रुग्णालयांत चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या पाठपुराव्यानंतर पुणे महानगरपालिका संचालित एस.एन.डी.टी महाविद्यालयात सहाव्या विलगीकरण केंद्राचे लोकार्पण श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. या ठिकाणी २५० रुग्ण विलिनीकरणात ठेवण्यात येतील. या लोकार्पणानंतर ते माध्यामांशी बोलत होते. तसेच, रेमडेसिविर उपलब्धता वाढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचीही घोषणा त्यांनी यावेळी केली.

यावेळी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ, सभागृह नेते मा. गणेश बिडकर, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, मनपा उपायुक्त राजेंद्र मुठे, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पखाले,वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त

मा. संतोष वारुळे, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा तारडे, नगरसेवक सुशिल मेंगडे, नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे, वृषाली चौधरी, मिताली सावळेकर, कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनीत जोशी, राजेंद्र येडे, बाळासाहेब धनवे, निलेश गरुडकर, ऍड.प्राची बगाटे आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, कोरोनावर नियंत्रण मिळवताना ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांच्यावर उपचारासाठी सेंटर उभी करत असताना, ऑक्सिजन बेड वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. पण त्याबरोबरच जे बाधित आहेत, त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.

विरारमधील दुर्घटनेवर बोलताना श्री. पाटील म्हणाले की, कोणत्याही चौकशीशिवाय यावर बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. कोविड मध्ये काम करणारा कर्मचारी हा जिवावर उदार होऊन काम करत आहे. त्यामुळे एखादी चूक नक्की तांत्रिक कारणामुळे झाली की, ह्यूमन एअररमुळे ही चूक झाली, हे शोधायला लागेल. यातून अशा घटना पुन्हा होणार नाहीत, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

रेमडेसीवीरच्या विषयावर बोलताना श्री पाटील म्हणाले की, सध्या राज्यात रेमडेसीवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही डिस्ट्रिब्यूटर अॅडव्हान्स पेमेंट शिवाय रेमडेसीवीरचा पुरवठा करण्यास नकार देत आहेत. त्याचा परिणाम रुग्णांवरील उपचारांवर होत आहे. त्यामुळे जे डिस्ट्रिब्यूटर अॅडव्हान्स पेमेंट घेतल्याशिवाय रेमडेसीवीरचा पुरवठा करण्यास असमर्थता दर्शवतील, त्यांना मी पुढाकार घेऊन समाजातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून पैसे मिळवून देऊ, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रात रेमडेसीवीरचा तुटवडा निर्माण होणार नाही, आणि रुग्णांवर योग्यवेळी उपचार होऊन, ते बरे होतील.


Back to top button
Don`t copy text!