

स्थानिक गुन्हे शाखा (सातारा) आणि फलटण शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने धुळदेव (ता. फलटण) हद्दीत छापा टाकून बेकायदेशीररीत्या गांजा विक्री करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याकडून ४ किलो ६९ ग्रॅम गांजासह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ३० मे : सातारा जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात आहेत. याच अनुषंगाने सातारा स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि फलटण शहर पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करत धुळदेव (ता. फलटण) गावच्या हद्दीतील रावरामोशी पुलाजवळ गांजा विक्रीच्या उद्देशाने आलेल्या दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ४ किलो ६९ ग्रॅम गांजा, एक दुचाकी आणि २ मोबाईल असा एकूण २ लाख १ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीवरून सापळा
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी जिल्ह्यात अवैध व्यवसाय व गांजा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. २९ मे रोजी फलटण हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी सुरू असताना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांना गोपनीय माहिती मिळाली. दोन व्यक्ती बजाज प्लॅटिना दुचाकीवरून (MH 12 HX 2649) धुळदेव हद्दीतील रावरामोशी पुलाजवळ गांजा विक्रीसाठी येणार असल्याची पक्की खबर त्यांना मिळाली होती.
संयुक्त पथकाची यशस्वी कारवाई
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पथक आणि फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे, स.पो.नि. मिठू जगदाळे यांच्या पथकाने नियोजन करून सदर ठिकाणी संयुक्तपणे छापा टाकला. यावेळी दोन संशयित व्यक्ती पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडील पिशवीत ४ किलो ६९ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी गांजा, दुचाकी आणि मोबाईल असा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी
ही मोठी कारवाई सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. विश्वजित घोडके (स्थानिक गुन्हे शाखा), पो.नि. अरविंद काळे (फलटण शहर), स.पो.नि. मिठू जगदाळे, नितीन शिंदे, पो.उ.नि. विश्वास शिंगाडे, परितोष दातीर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार मंगेश महाडिक, अमोल माने, अजय जाधव, जयवंत खांडके, अमित झेंडे, नवनाथ कदम, अजित कर्णे, अमित सपकाळ, ओंकार यादव, स्वप्निल दौंड, धीरज महाडिक, प्रवीण पवार, संकेत निकम, विजय निकम, आनंदा भोये तसेच फलटण शहर पोलीस ठाण्याकडील अंमलदार रुक्मिणी माने, बापूराव धायगुडे, निखिल गायकवाड, गणेश आवघडे, अतुल बडे यांनी केली.
या यशस्वी कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण पोलीस पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे.
