जनगणनेत ‘ओबीसी’चा कॉलमच नाही, मग उपयोग काय? जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे : प्रा. लक्ष्मण हाके


सध्या सुरू असलेल्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमच नसल्याने या जनगणनेचा नेमका उपयोग काय, असा घणाघाती सवाल उपस्थित करत देशात आणि राज्यात ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, अशी ठाम मागणी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली.

स्थैर्य, दुधेबावी, दि. ३० मे : राज्यात आणि देशात जातीनिहाय जनगणना व्हावी, या प्रमुख मागणीसाठी प्रा. लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली सध्या ‘ओबीसी जनगणना आणि जनजागृती अभियान’ राबवले जात आहे. या अभियानांतर्गत दुधेबावी (ता. फलटण) येथे आयोजित विशेष ग्रामसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरील वाढते संकट आणि राजकीय प्रतिनिधित्वाची गरज यावर सविस्तर भाष्य केले.

हक्काच्या निधीसाठी राजकीय प्रतिनिधित्व आवश्यक

यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले की, “आम्हाला आमच्या समाजाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीच्या प्रमाणात शासनाकडून निधी मिळाला पाहिजे, जो सध्या दिला जात नाही. हा हक्काचा निधी मिळवण्यासाठी विधिमंडळ आणि संसदेत आपली ओबीसींची माणसं असणे अत्यंत आवश्यक आहे.” मूळ ओबीसीचे आरक्षण जर धोक्यात आले किंवा गेले, तर पुढच्या काळात समाजातील कोणत्याही व्यक्तीला राजकीय पदांवर जाता येणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

खोट्या दाखल्यांवरून संताप; रस्त्यावर उतरण्याचे आवाहन

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सरकारने एकदाही ओबीसींची अधिकृत जनगणना केलेली नाही. गावकुसातील माणसाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण देण्यात आले, परंतु आता तेच हिसकावून घेण्याचे षड्यंत्र सुरू आहे. खोटे पुरावे आणि दाखले देऊन काही मंडळी ओबीसींच्या हक्काची पदे लाटत असतील तर आपण गप्प बसायचे का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय जागरूकतेची तुलना केली. “मराठवाड्यातील जनता आता पुढे आली असून तिथे आगामी काळात ओबीसींचे आमदार नक्की होतील. मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील जनतेने अजूनही गुलामी स्वीकारली आहे, ते पुढे येऊन बोलायला तयार नाहीत. जर तुम्हालाही आगामी काळात आमदार, खासदार व्हायचे असेल, तर हक्कांसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल,” असे आवाहन प्रा. हाके यांनी केले.

मान्यवरांची उपस्थिती

या ग्रामसभेत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे, बहुजन समाज पार्टीचे नेते काळुराम चौधरी, बारामतीच्या नगरसेविका संघमित्रा चौधरी, पै. बजरंग गावडे आणि डॉ. सागर कराडे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत समाजाला संघटित होण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास युवा नेते बापूराव सोनवलकर, नागेश वाघमोडे, दुधेबावीच्या सरपंच सौ. भावनाताई सोनवलकर, पै. आप्पा लोखंडे, विकास सोनवलकर, श्रीमंत नाळे, उपसरपंच तानाजी नाळे, सुरेश नाळे, अक्षय सोनवलकर, प्रकाश सोनवलकर, सनी नाळे, सचिन सोनवलकर यांच्यासह ग्रामस्थ व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!