फलटण: पालखी मार्गावरील अतिक्रमणे ७ दिवसांत हटवा; नगरपरिषदेचा व्यावसायिकांना कडक इशारा


श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने, या मार्गावरील सर्व कच्ची, पक्की आणि अनधिकृत अतिक्रमणे येत्या सात दिवसांत स्वतःहून काढून घ्यावीत, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा फलटण नगरपरिषदेने दिला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ३० मे : फलटण शहरातून जाणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वेगाने सुरू आहे. या कामात अडथळा ठरणारी रस्त्याच्या दुतर्फा असलेली सर्व कच्ची, पक्की तसेच अनधिकृत वाढीव बांधकामे आणि अतिक्रमणे काढून घेणे आवश्यक बनले आहे. या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी एका जाहीर आवाहनाद्वारे नागरिकांना व व्यावसायिकांना कडक इशारा दिला आहे.

स्वतःहून अतिक्रमण न काढल्यास कारवाई

रस्त्याच्या बाजूस अतिक्रमण केलेले दुकानदार, व्यावसायिक, टपरीधारक आणि हातगाडीधारक यांनी आपली अतिक्रमणे येत्या सात दिवसांच्या आत स्वतःहून काढून घ्यावीत. दिलेल्या मुदतीत अतिक्रमणे न काढल्यास नगरपरिषदेच्या पथकामार्फत ती काढण्यात येतील. या कारवाईदरम्यान होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस संबंधित व्यावसायिक आणि नागरिक स्वतः जबाबदार राहतील, याची नोंद घेण्याचे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.

‘या’ मार्गांवरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश:

नगरपरिषदेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील खालील मार्गांवरील अतिक्रमणे तातडीने काढणे आवश्यक आहे:

  • गिरवी नाका ते श्रीमंत मालोजीराजे पुतळा
  • श्रीमंत मालोजीराजे पुतळा ते गजानन चौक
  • गजानन चौक ते पाचबत्ती चौक
  • पाचबत्ती चौक ते उब्रेश्वर चौक
  • उब्रेश्वर चौक ते जिंती नाका
  • डेक्कन चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक
  • छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नाना पाटील चौक
  • नाना पाटील चौक ते श्रीराम कारखाना

पालखी सोहळा जवळ येत असल्याने नगरपरिषदेने रस्ते मोकळे करण्याची मोहीम हाती घेतली असून, नागरिकांनी या कामात प्रशासनाला सहकार्य करावे, असे अपेक्षित आहे.


Back to top button
Don`t copy text!