पुणे येथे ‘पाथवे टू वर्ल्ड पीस’ (विश्व शांतीचा मार्ग) या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० जून २०२३ । पुणे । जगात शांतता आणि समृद्धीचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सर्वधर्मसमभाव आणि सर्वांशी मिळून मिसळून वागण्याची, सहचर्याची भावना बाळगणे गरजेचे आहे; त्यासाठी मुलांना शालेय जीवनापासूनच सर्व धर्मांचा सन्मान करण्याची शिकवण दिली जावी, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

एमआयटी कोथरूड येथे आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी एमआयटी विश्व शांति केंद्राचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया पुरस्काराने सन्मानित डॉ. विजय जोशी, एमआयटी विश्व शांती विश्वविद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल कराड, एमआयटी आर्ट डिझाईन टेक्नोलॉजी युनिवर्सिटीचे कुलगुरु डॉ.मंगेश कराड, टाइम्स ग्रुपच्या सह उपाध्यक्ष भावना रॉय आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.बैस म्हणाले, गरीब आणि कष्टकऱ्यांप्रती संवेदना बाळगूनच शांतता प्रस्थापित करता येऊ शकते. एक जग समृद्ध होत असताना दुसऱ्या जगात दारिद्र्य पहायला मिळते. हा असमतोल दूर करून जगात शांतता आणि समृद्धीचे राज्य आणता येईल. भारतीय संस्कृतीने ‘वसुधैव कुटुंबकम्’ चा विचार जगाला दिला आहे. याच विचाराच्या आधारे जगात शांतता नांदू शकेल.

जगातील अनेक देश प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या युद्धाने प्रभावित आहेत. युद्ध आणि अशांततेच्या बातम्या दररोज समोर येत असताना शांततेचा विचार आज अधिक प्रासंगिक आहे. भगवद्गीता आणि त्यावर आधारीत ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथातून मांडलेला विचार आपल्यात शांतता आणि सद्भावना निर्माण करण्याचा मार्ग प्रशस्त करणारा आहे. या विचाराद्वारे जगातही शांतता प्रस्थापित करता येते.

विरोधी विचाराला बळाने नव्हे तर आत्मिक बळाने जिंकता येते हा महात्मा गांधींचा विचार मार्गदर्शक आहे. भगवान गौतम बुद्धांनी अहिंसा आणि करुणेच्या संदेशाचा प्रसार केला. सम्राट अशोकने युद्धापासून दूर राहण्यासाठी बुद्धविचार अनुसारला. भगवान महावीर आणि येशू ख्रिस्तानेही क्षमा आणि शांतीचा संदेश दिला. आपल्या भारतीय संस्कृतीची श्रेष्ठता जगाने मान्य केली आहे, जग आज भारताकडे आकर्षित होत आहे. आपणही आपल्या देशाचे सांस्कृतिक मूल्य जाणून घेणे आवश्यक आहे.

यावेळी डॉ.विश्वनाथ कराड यांनीही विचार व्यक्त केले. प्रा.मंगेश कराड यांनी प्रास्ताविकात एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सीटीच्या उपक्रमांविषयी माहिती दिली.

एमआयटी विश्व शांति केंद्राचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रा.विश्वनाथ कराड लिखीत ‘पाथवे टू वर्ल्ड पीस’ (विश्व शांतीचा मार्ग) या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल महोदयांच्या हस्ते करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!