

फलटण शहर पोलिसांनी सी.ई.आय.आर. पोर्टलच्या मदतीने १२ लाख रुपये किमतीचे ४० हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत केले आहेत. पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २५ मे : फलटण शहर पोलिसांनी सी.ई.आय.आर. (CEIR) पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक विश्लेषण करून तब्बल १२ लाख रुपये किमतीचे ४० गहाळ झालेले मोबाईल शोधून काढले आहेत. हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले असून, पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे नागरिकांकडून मोठे कौतुक होत आहे.
परराज्यांतूनही शोधले मोबाईल
सातारा जिल्ह्यामध्ये गहाळ मोबाईल शोधण्याची मोहीम राबविण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी दिल्या होत्या. यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे आणि पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तपास केला. कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात आणि तेलंगणा या राज्यांसह महाराष्ट्रातील कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, धुळे आणि पुणे जिल्ह्यांतून हे मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना मोठे यश आले.
आतापर्यंत ४५५ मोबाईल मालकांना सुपूर्द
सोमवारी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, तहसीलदार अभिजित जाधव आणि पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या हस्ते संबंधितांना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले. आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले. सन २०२४ पासून आतापर्यंत फलटण शहर पोलिसांनी तब्बल ४५५ गहाळ झालेले मोबाईल मूळ मालकांना परत केले आहेत.
मोबाईल चोरीला गेल्यास किंवा गहाळ झाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तपास पथक
या विशेष शोध मोहिमेत महिला पोलीस उपनिरीक्षक अयोध्या घोरपडे, सी.ई.आय.आर. पोर्टलचे कामकाज पाहणारे पोलीस अंमलदार स्वप्नील खराडे, राणी फाळके, महेश जगदाळे, जितेंद्र टिके, मुकेश घोरपडे आणि अतुल बडे यांनी सहभाग घेतला.
