

येत्या २८ मे रोजी होणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी गोवंशाची अवैध कत्तल करणाऱ्यांवर थेट ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केली जाईल, असा कडक इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २५ मे : उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, तहसीलदार अभिजित जाधव आणि पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला शांतता कमिटी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, मोहल्ला कमिटी सदस्य, पत्रकार, गोरक्षक आणि कत्तलखाना चालवणारे व्यावसायिक उपस्थित होते. सर्वांची मते जाणून घेत सण शांततेत साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले.
परवाना आणि नियमांचे पालन सक्तीचे
बकरी ईदच्या निमित्ताने कत्तलखाना सुरू करण्यासाठी नगरपालिकेकडून तात्पुरता परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, गाय, वासरू आणि खोंड यांची कोणत्याही परिस्थितीत कत्तल केली जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सक्त सूचना व्यावसायिकांना देण्यात आल्या आहेत.
अवैध कत्तलींवर ‘मोक्का’ची कारवाई
शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. नवीन शासकीय परिपत्रकानुसार, जी व्यक्ती किंवा टोळी अवैध कत्तल करेल त्यांच्यावर ‘मोक्का’ (MCOCA) लावण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. तसेच, कत्तलखाना धारकांना बीएनएसएस (BNSS) कलम १६८ प्रमाणे नोटिसा बजावण्यात आल्या असून, पोलिसांचे यावर बारकाईने लक्ष राहणार आहे.
