जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकाला मारहाण – संशयिताला अटक


खंडाळा तालुक्यातील सुखेड येथे जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी लोणंद पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.

स्थैर्य, लोणंद, दि. २५ मे : खंडाळा तालुक्यातील सुखेड येथे रविवारी सायंकाळी राष्ट्रीय जनगणनेचे काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकाला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

जनगणनेच्या कामात अडथळा

राजेंद्र दशरथ पिसाळ (वय ५२, रा. होळ, ता. फलटण) हे प्राथमिक शिक्षक असून, त्यांच्याकडे शासनाचे राष्ट्रीय जनगणना आणि दुकान गणनेचे काम सोपवण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास ते सुखेड गावातील खंडाळा रस्त्यावरील जय मल्हार चिकन सेंटरसमोर हे काम करत होते. त्यावेळी संशयित दीपक कुंडलीक धायगुडे (रा. सुखेड) तिथे आला.

पोलिसांची धडक कारवाई

संशयिताने राजेंद्र पिसाळ यांना विनाकारण शिवीगाळ व दमदाटी सुरू केली. तसेच, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांना शासकीय कर्तव्यापासून परावृत्त करत कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पिसाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.

पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित दीपक धायगुडे याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार टेकवडे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!