लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यावरील ‘दौलत’ या चरित्रग्रंथाचे ७ जून रोजी प्रकाशन; राजभवन येथे ७ जून २०२३ रोजी सायंकाळी ६ .३० वाजता महामहीम राज्यपाल मा. रमेशजी बैस यांच्या हस्ते प्रकाशन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २ जून २०२३ | मुंबई | महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनकार्याचा सविस्तर परिचय करून देणाऱ्या ‘दौलत : दौलतराव श्रीपतराव देसाई’ चरित्रग्रंथाचे प्रकाशन बुधवार,दि. ७ जून २०२३ रोजी सायंकाळी ६ .३०वाजता होत आहे. महामहीम राज्यपाल मा. रमेशजी बैस यांच्या शुभहस्ते आणि मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील राजभवन येथे हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रक राज्य उत्पादन शुल्क मंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी दिली.

महाराष्ट्राच्या गृह, सार्वजनिक बांधकाम, कृषी, शिक्षण,महसूल आदी महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी समर्थपणे सांभाळत राज्याच्या उभारणीत अमूल्य योगदान देणारे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यावरील ‘दौलत’ या चरित्रग्रंथाचे लेखन/संपादन ज्येष्ठ पत्रकार-संपादक मधुकर भावे यांनी केले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राबविलेली धोरणे, घेतलेले क्रांतिकारी निर्णय आणि सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान यांचा सविस्तर आढावा या चरित्रग्रंथात घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या संकल्पनेतून हा चरित्रग्रंथ आकारास आला असून दौलत उद्योग समूहाच्या विद्यमाने या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा राजभवनातील दरबार हॉल येथे दि. ७ जून २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

राजभवन दरबार हॉल येथील आसन क्षमता मर्यादित असल्यामुळे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पावनगड निवासस्थान मंत्रालयासमोर आणि लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक, दौलतनगर, मरळी, ता. पाटण येथे करण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!