विद्यार्थिनींना सर्पदंश झालेल्या आश्रमशाळेची मान्यता रद्द

राज्यातील सर्व आश्रमशाळांची होणार तपासणी

दैनिक स्थैर्य | दि. १२ ऑगस्ट २०२६ | मुंबई |
गडचिरोली जिल्ह्यातील एका अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहातील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या गंभीर घटनेचे पडसाद मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. घटनेचे गांभीर्य ओळखत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित आश्रमशाळेची शासकीय मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश दिला. याशिवाय या आदिवासी आश्रमशाळेची तपासणी करून अहवाल दिलेल्या अधिकार्‍याला निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

विशेष म्हणजे ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा होत असताना गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील एका अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात मध्यरात्री सहा विद्यार्थिनींना विषारी साप चावला.या सर्पदंशामुळे तीन विद्यर्थिनींचा मृत्यू झाला. तर अन्य तिघींवर उपचार सुरू आहेत. या घटनेने आश्रमशाळा वसतिगृहातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

याशिवाय मुख्यमंत्र्यांनी सर्व शासकीय आदिवासीआश्रमशाळांची तपासणी करण्याचे आदेश दिले. ही तपासणी करताना केवळ रस्त्यावरच्या आश्रमशाळांची पाहणी करू नका तर दुर्गम भागातील आश्रमशाळांची सुद्धातपासणी करा. त्यासाठी मुख्य सचिवांनी एक बैठक घेऊन सर्वकष तपासणीची यंत्रणा उभी करण्यात यावी.सर्व विभागांना त्यात समाविष्ट करा, अशा सूचना फडणवीस यांनी केल्या.

प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे निर्देश

या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. ही घटना ज्या आश्रमशाळेच्या वसतिगृहात घडली ती संस्था तीनवेळा आमदार आणि एकदा खासदार राहिलेले काँग्रेसचे मारोतराव कोवासे यांची आहे. ते अशा पद्धतीने आश्रमशाळा चालवत असतील आणि लहान मुलींच्या सुरक्षेशी खेळत असतील तर ते कसे माफ करणार? असा सवाल उईके यांनी यावेळी केला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, ही आश्रमशाळा शासकीय अनुदान घेत असतानाहीशिक्षक, वॉर्डन तसेच इतर सुविधा देत नाही. त्यामुळे या आश्रमशाळेची ज्या अधिकार्‍याने तपासणी केली आणि अहवाल दिला त्याला निलंबित करण्यात यावे. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.

Back to top button
Don`t copy text!