व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनाला गती द्या; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

महा कॅम्पाच्या निधीतून व्याघ्र प्रकल्प व संरक्षित क्षेत्रांतील गावांच्या पुनर्वसनाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, उपग्रहाद्वारे वनीकरणाच्या कामांची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

स्थैर्य,सातारा, दि. २७ ऑक्टोबर : वनसंवर्धन राखीव क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कॅम्पा निधीचा प्रभावी वापर करण्यात यावा. या निधीच्या माध्यमातून व्याघ्र प्रकल्प आणि इतर संरक्षित क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनाची कामे वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरणांच्या (महा कॅम्पा) आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे वनमंत्री गणेश नाईक उपस्थित होते.

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कामांची पडताळणी

मुख्यमंत्री म्हणाले की, कॅम्पाअंतर्गत पूर्ण झालेल्या वनीकरण, मृद व जलसंधारणाच्या कामांची उपग्रह आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पडताळणी करण्यात यावी. पडताळणी पद्धतीत बदल करून कामकाजात अधिक पारदर्शकता आणावी. राष्ट्रीय कॅम्पा निधीतून राज्यातील राखीव वनक्षेत्रातील गावांच्या टप्प्याटप्प्याने पुनर्वसनासाठी केंद्राकडे अतिरिक्त निधीची मागणी करून पाठपुरावा करण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी या निधीतून कुरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवून चाऱ्याची उपलब्धता वाढवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

विविध विकासकामांचा आढावा

बैठकीत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, पर्यायी वनीकरण योजनेअंतर्गत १ लाख ७ हजार ८६५ हेक्टरवर रोपवनाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच ५६२ निवासस्थाने, ८३ कार्यालये आणि महिलांसाठी ६२ विश्रामगृहे उभारण्यात आली आहेत. १५ हजार ७२४ हेक्टर क्षेत्रावर कुरण विकास कामे झाली असून या निधीतून आतापर्यंत ५५ गावांचे यशस्वी पुनर्वसन करण्यात आले असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!