
मोबाईलमध्ये इंटरनेट नसतानाही केवळ पीओएस मशीनला फोन टॅप करून ५ हजार रुपयांपर्यंतचे विनापिन डिजिटल व्यवहार करणे आता शक्य होणार आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ११ सप्टेंबर : युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसद्वारे (UPI) डिजिटल व्यवहार करणाऱ्या अब्जावधी नागरिकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) मोठी घोषणा केली आहे. मुंबईत आयोजित ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’मध्ये ‘यूपीआय टॅप अँड पे’ (UPI Tap & Pay) ही नवी सुविधा लाँच करण्यात आली आहे. या सुविधेमुळे आता कॅमेरा उघडून क्यूआर (QR) कोड स्कॅन करण्याची कटकट संपणार असून, फोन केवळ टॅप करून जलद आणि सुलभतेने पैसे भरता येणार आहेत.
इंटरनेट आणि अँप उघडण्याची गरज नाही
नव्या तंत्रज्ञानानुसार एनएफसी (NFC) सुविधा असलेल्या स्मार्टफोनधारकांना हे वैशिष्ट्य वापरता येणार आहे. यासाठी कोणत्याही यूपीआय ॲप किंवा कॅमेरा स्कॅनर उघडण्याची गरज भासणार नाही. ग्राहकाचा मोबाईल डेटा बंद असला किंवा नेटवर्क नसले तरीही, व्यापाऱ्याच्या पीओएस (PoS) मशीनमधील इंटरनेटच्या मदतीने हा व्यवहार पूर्ण होईल. त्यामुळे तळघरातील दुकाने, मेट्रो स्टेशन किंवा नेटवर्क नसलेल्या ठिकाणीही सहज पेमेंट करणे शक्य होणार आहे.
५ हजारांपर्यंतच्या व्यवहारासाठी पिनची गरज नाही
सुरक्षितता आणि सुलभतेचा समतोल राखत एनपीसीआयने ५ हजार रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी यूपीआय पिन प्रविष्ट करण्याची अट रद्द केली आहे. अवघ्या एका टॅपवर हे व्यवहार पार पडतील. तर ५ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारासाठी पीओएस मशीनवरच यूपीआय पिन टाकून सुरक्षित पेमेंट पूर्ण करता येईल. या तंत्रज्ञानामुळे दुकानांमधील डिजिटल पेमेंट अधिक वेगवान होऊन ग्राहकांचा वेळ वाचणार आहे.