
थेट WhatsApp वर मिळवा
कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन झाल्यानंतर रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करणे अत्यंत गरजेचे असते. अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत पोर्टलद्वारे नागरिक आता घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी अर्ज करू शकतात.
स्थैर्य, सातारा, दि. १६ नोव्हेंबर : लग्नानंतर नवीन सुनेचे नाव असो किंवा घरातील नवजात बाळाचे नाव, रेशन कार्डमध्ये प्रत्येक सदस्याची नोंद असणे आवश्यक आहे. शासनाच्या शासकीय योजना, मोफत किंवा सवलतीच्या दरातील धान्य आणि विविध कागदपत्रांसाठी अद्ययावत रेशन कार्ड उपयुक्त ठरते. पूर्वी यासाठी महसूल कार्यालयात जावे लागत होते, परंतु आता महाराष्ट्र शासनाच्या ‘rcms.mahafood.gov.in’ या पोर्टलवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नाव जोडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया
रेशन कार्डमध्ये नाव जोडण्यासाठी मूळ रेशन कार्ड, नवीन सदस्याचे आधार कार्ड, तसेच लहान मुलासाठी जन्म दाखला आणि विवाहित महिलेसाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र व माहेरच्या रेशन कार्डवरील नाव कमी केल्याचा दाखला (Deletion Certificate) आवश्यक असतो. अर्ज करण्यासाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पब्लिक लॉगिन करावे आणि ‘Add New Member’ पर्यायाची निवड करून विचारलेली सर्व माहिती व कागदपत्रे अपलोड करावीत.
अर्ज केल्यानंतर मिळणारा संदर्भ क्रमांक (Application Number) जपून ठेवावा, याद्वारे अर्जाची सद्यस्थिती तपासता येते. अर्ज मंजूर झाल्यानंतर नवीन ई-रेशन कार्ड डाउनलोड करता येते. तसेच कोणत्याही तांत्रिक अडचणीसाठी किंवा तक्रारीसाठी शासनाच्या टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येतो, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.





